मनसे चे शिष्टमंडळ आयुक्तांना भेटले .. नवी मुंबई मनपाच्या अग्निशमन विभागात घोटाळा , दोषींवर कारवाई करण्याचा करू नका कंटाळा

0
27

 

अन्याय झालेल्या उमेदवारांना न्याय द्या आणि दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी

नवी मुंबई _ क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” _ प्रतिनिधी _ नवी मुंबई महानगर पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या अंतर्गत गट – क संवर्गातील रिक्त पदे भरण्यासाठी दिनांक ३/९/२०१८ रोजी जाहिरात (क्रमांक २/२०१८) काढण्यात आली. सरळ सेवा भरतीसाठी विविध पदांसाठी ऑनलाइन पद्धतीने महापरीक्षा पोर्टल या संकेत स्थळा द्वारे भरती प्रक्रिया पुर्ण करण्यात आली. ४१६ उमेदवारांपैकी गुणवत्तेनुसार पात्र ठरलेल्या उमेदवारांना सेवेते सामावून घेतले. परंतु १८ उमेदवारांना अग्निशामक पदाकरिता आवश्यक असणारी अर्हता धारण केलेली नसल्याचे कारण देत अपात्र करण्यात आले.
सर्व १८ उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज केले होते. असे असताना संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर अपात्र ठरलेल्या उमेदवारांनी महानगरपालिका प्रशासन विभागाला विचारणा केली असता प्रशासन विभागाने त्यांना तुमची शैक्षणिक अर्हता नसल्याने तुम्हाला भरती प्रक्रियेतून अपात्र ठरवण्यात येत आहे, असे उत्तर दिले. या सर्व उमेदवारांनी उपस्थानक व आग प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम १ वर्ष कालावधी असलेला प्रगत पाठ्यक्रम पुर्ण केलेला आहे आणि हा पाठ्यक्रम या पदाच्या नियुक्तीकरिता पात्र आहे, असे लेखी उत्तर महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय यांनी दिलेले आहे. २००७ साली हाच पाठ्यक्रम पुर्ण केलेला उमेदवार ओमप्रकाश वाघमारे यांची अग्निशामक या पदावर नियुक्ती केली होती .
वरील उमेदवारांची शैक्षणिक अर्हता होती म्हणून प्रशासन विभागाने या उमेदवारांची निवड केली, त्यांची कागदपत्र पडताळणी झाली, मैदानी चाचणी, वैद्यकीय तपासणी व लेखी परीक्षा या सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर उप स्थानक व आग प्रतिबंधक अधिकारी पाठ्यक्रम पुर्ण केला असल्याने निवड यादीमधून त्यांना अपात्र ठरवण्यात आले.
सदर पाठ्यक्रम पदाच्या नियुक्तीकरिता पात्र आहे. असे असतानाही सर्व प्रक्रिया पुर्ण केल्यानंतर निवड यादीमधून नाव वगळणे म्हणजे या भरती प्रक्रियेमध्ये सरळसरळ भ्रष्ट्राचार झाला आहे, असे प्रथमदर्शनी दिसते असा आरोप नवी मुंबई मनसेचे शहरअध्यक्ष गजानन काळे यांनी केला आहे. या १८ उमेदवारांना पालिकेत सामावून घ्या आणि या प्रकरणाची चौकशी करा या मागण्या घेऊन मनसेचे शिष्टमंडळ महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांना भेटले. आयुक्त अभिजित बांगर यांनी सुद्धा प्रथमदर्शनी घोळ असल्याचे मान्य केले आणि या प्रकरणावर लवकरच योग्य कार्यवाही करू असे आश्वासन मनसे शिष्टमंडळाला दिले. मनसेच्या या शिष्टमंडळात शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष निलेश बाणखिले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, शहर सचिव सचिन कदम, पालिका कामगार सेना शहर संघटक अप्पासाहेब कौठुळे , वाहतूक सेना राज्य उपाध्यक्ष नितीन खानविलकर, रोजगार विभाग शहर संघटक सनप्रीत तुर्मेकर, शहर सह सचिव अभिजित देसाई, अमोल इंगोले, विभाग अध्यक्ष अमोल आयवले हे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here