स्वप्निल फाऊंडेशन तर्फे ७२ कर्तुत्ववान महिला आणि समाजसेवकांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला

0
9
Oplus_131072

भारत पवार : मुख्य संपादक _ ९१५८४१७१३१ 
पुणे : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज पेपर अँड न्यूज चॅनल नेटवर्क  समाजातील विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महाराष्ट्रातील ७२ महिलांचा आणि उल्लेखनीय काम करणाऱ्या समाजसेवकांचा ‘स्वप्नल फाउंडेशन’तर्फे राज्यस्तरीय पुरस्कार देऊन दिमाखदार सोहळ्यात गौरव करण्यात आला. संस्थेचे हे १३ वे वर्ष असून, २३ मार्च रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
​स्वप्नल फाउंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ. शोभा चंद्रकांत बल्लाळयांनी दोन मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेतले आहे. यांच्या पुढाकाराने आयोजित या कार्यक्रमात शिक्षण, आरोग्य, साहित्य, क्रीडा, प्रशासन आणि सामाजिक क्षेत्रात निस्वार्थ सेवा करणाऱ्या दिग्गजांना सन्मानित करण्यात आले.
​सामाजिक बांधिलकीचा गौरव
या सोहळ्यात समाजातील उपेक्षित घटकांसाठी झटणाऱ्यांचा विशेष सन्मान झाला. यामध्ये महापालिका शाळेतील मुलांना दरवर्षी शालेय साहित्य वाटप करणारे कुमार शिंदे आणि बेवारस मृतदेहांच्या अस्थींचे सर्वपित्री अमावस्येला विधिवत विसर्जन करणारे तसेच 100 वेळा रक्तदान करणारे सदाशिव कुंदेन सर यांच्या कार्याला उपस्थितांनी सलाम केला. तसेच, ९९ वेळा रक्तदान करणाऱ्या अंजू सोनवणे, अविरत समाजसेवा करणारे रमाकांत गुंड आणि जालन्याहून आलेल्या मनोरुग्णांना बरे करून त्यांना आधार देणारे सविता व बाबासाहेब शेळके दांपत्य यांचाही गौरव करण्यात आला. अनाथ मुले, निराधार महिला आणि वृद्धांचा सांभाळ करणाऱ्या स्वाती डी मळे यांच्या कार्याचेही यावेळी विशेष कौतुक झाले.
​जिद्द आणि कर्तृत्वाला सलाम
स्वतः अंध असूनही शिक्षण संस्था उभारून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या जाई खामकर यांचा सन्मान सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. यासोबतच कुक्कुटपालन व्यवसायात यशस्वी ठरलेल्या वैशाली मंडलिक, उमरगा येथील गृहउद्योजिका वर्षा कलशेट्टी, फॅशन डिझायनर चंदन मते आणि वकील म्हणून सामाजिक कार्य करणाऱ्या विभावरी ताई यांचाही सन्मान करण्यात आला.    ​साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल कविता काळे यांना ‘साहित्यरत्न’, नृत्यासाठी लौकिक पानसरे, क्रीडा क्षेत्रासाठी चैतन्य कुलकर्णी (‘क्रीडा रत्न’), तर पत्रकारितेसाठी ओंकार वाबळे यांना ‘निर्भीड पत्रकार’ पुरस्काराने गौरविण्यात आले. लावणी सम्राज्ञी लता पुणेकर यांच्यासह आदर्श सरपंच, उपसरपंच, कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी आणि लीगल सेलच्या प्रतिनिधींचाही या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये समावेश होता.
​सांस्कृतिक मेजवानी आणि मान्यवरांचे मार्गदर्शन
याप्रसंगी ठाण्याहून आलेल्या ममता मैसूरकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले ‘नवदुर्गा नृत्य’ आणि लता पुणेकर यांची ‘लावणी’ उपस्थितांची दाद मिळवून गेली. डॉ. दत्ता कोहिनकर यांनी उपस्थित महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबईच्या जे.जे. रुग्णालयाचे माजी अधीक्षक तथा औषध वैद्यकशास्त्र विभागप्रमुख डॉ. मधुकर गायकवाड होते. त्यांनी आपल्या भाषणात आरोग्याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली आणि समाज घडवणाऱ्या महिलांच्या योगदानाचे तोंडभरून कौतुक केले. कार्यकमास दत्ता कोहिंकर , हॉमिनिस्टर खेळांचा बादशाह बालगंधर्व पुरस्कार प्राप्त बाळकृष्ण नेहरकर , शिवाजी कोळी , पुणे जिल्हा क्रीडाधिकारी , दीपिका माथवड , मराठी सिने अभिनेत्री बालगंधर्व पुरस्कार विजेती , योगेश देशमुख , डॉ. राजेंद्र भवाळकर , अध्यक्ष रोटरी क्लब , गीतांजली कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.यशस्वी सोहळ्याचे आयोजन स्वप्नल फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले.सूत्र संचालन बाळकृष्ण नेहरकर आणि वाशिम भाई यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here