जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीचे तिव्र आंदोलन
जालना :- जालना जिल्ह्यात मागील काही महिन्यांपासून अत्याचाराच्या घटनेत वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या अत्याचारात बहुजनांचाच बळी जात आहे. या घटनेच्या निषेधार्थ वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तिव्र आंदोलन करण्यात आले. दिवसेंदिवस वाढणारे अत्याचार आणि प्रशासनावर पालकमंत्र्याचा अंकुश नसल्याने या घटना वाढत आहेत. त्यामुळे जालना जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कॅबीनेटमंत्री राजेश टोपे यांनी नैतीक जबाबदारी स्विकारुन राजीनामा द्यावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष दिपक डोके यांनी केली आहे.
भोकरदन तालुक्यातील धनगरवाडी चिंचोली (निपाणी) येथील मेंढपाळ रामदास जोशी योगेश जोशी यांना गावातील गावगुंडानी कुर्हाडीने डोक्यात व मानेवर घाव घालून तसेच अंगावर ट्रॅक्टर घालून गंभीर जखमी करीत त्यांचा खुन करण्यात आला. तर इतरांना गंभीर जखमी करण्यात आले. पिडीतांची फिर्याद न घेता पहिले आरोपीची फिर्याद दाखल करुन घेतली व नंतर आरोपीला अटक करण्याचे नाटक केले असल्याचा आरोप दिपक डोके यांनी केला आहे. आरोपी व पोलीस यांची मिलीभगत असून यामध्ये मयताला व पिडीतांना न्याय मिळणे शक्य नाही यासाठी सी.बी.आय मार्फत चौकशी करावी व तसेच मंठा येथील माळी समाजातील वैष्णवी गोरे या नवविवाहीत तरुणीची भरदिवसा निघृण हत्या झाली. ही घटना देखील शासनाने गांभीर्याने घेतले नसून त्या प्रकरणात पिडीतेला न्याय मिळालेला नाही.असेही दिपक डोके यांनी म्हटले आहे. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करुन निवेदन देण्यात आले.
बातमीचा आढावा घेतला -कसमादे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ”
जालना जिल्हा प्रतिनीधी
आशिष मोरे




