भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१ मालेगाव : क.टा. महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :
तालुक्यातील कौळाणे (नि.) येथे सार्वजनिक रहदारीच्या रस्त्यावर सुरू असलेले कथित बेकायदेशीर वेल्डिंग दुकान तात्काळ हटविण्याच्या मागणीसाठी युवा मराठा महासंघ यांच्या वतीने ग्रामपंचायतसमोर आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
महासंघाने संबंधित विभागीय अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गावातील सार्वजनिक रस्त्यावर बाळू रंगनाथ मोरे यांनी वेल्डिंग व्यवसायाचे दुकान थाटून अतिक्रमण केले आहे. दुकानासमोर वाहने उभी केल्यामुळे नागरिकांच्या येण्या-जाण्यास अडथळा निर्माण होत असून रहदारीला धोका निर्माण होत आहे, असा आरोप करण्यात आला आहे.
तसेच, ग्रामपंचायत प्रशासनाची दिशाभूल करून घराची जागा वाढीव नोंद करून घेतल्याचा तसेच निवासी कर भरून व्यावसायिक कर टाळल्याचा आरोपही निवेदनात नमूद करण्यात आला आहे. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या महासंघाच्या अध्यक्षांची लिखित स्वरूपात बदनामी केल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.
वरील सर्व बाबींवर तात्काळ कारवाई करून संबंधित दुकान कायमस्वरूपी रस्त्यावरून हटवावे, अन्यथा ११ मार्च २०२६ रोजी श्रीमंत सयाजीराव महाराज गायकवाड यांच्या जयंती दिनापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात येईल, असा इशारा महासंघाने दिला आहे.
दरम्यान, या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत प्रशासन व संबंधित विभाग कोणती भूमिका घेतात, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागले आहे.





