महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार संघर्ष अटळ : अविनाश पाठक

0
353

भारत पवार :  मुख्य संपादक : महाराष्ट्र न्यूज साठी                       आपल्या परिसरातील बातम्या,जाहिराती तसेच नव्याने पत्रकार नियुक्ती करण्यात येत आहे इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क : मो.९१५८४१७१३१.                                        महाराष्ट्रात आता पवार विरुद्ध पवार हा संघर्ष अटळ -अविनाश पाठक यांचे मनोगत !!

मुंबई : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : वेब चॅनल –  जगदीश का. काशिकर,
मुक्त पत्रकार व गुंतवणुक/कामगार समस्या/कायदे सल्लागार, मुंबई, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७

भारतीय राजकारणात कौटुंबिक कलह हा प्राचीन काळापासून सुरू असलेला दिसतो. अगदी महाभारत काळ बघितला तरी सत्तेसाठी कौरव आणि पांडव या एकाच कुटुंबातील चुलत बंधूंमध्ये झालेले महाभारताचे युद्ध हे सर्वज्ञात आहे. हीच परंपरा पुढेही सुरू राहिली आणि आजही तशीच सुरू आहे.

आज विसाव्या किंवा २१व्या शतकातही सत्तेसाठी असे कौटुंबिक कलह कायम होताना दिसतात. सुमारे ४० वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील शिंदे परिवारातील विजयाराजे शिंदे आणि माधवराव शिंदे या मायलेखांमधला संघर्ष सर्वश्रुतच आहे. काही वर्षांपूर्वी गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे या काका पुतण्यांचा संघर्ष देखील महाराष्ट्राने अनुभवला आहे.इतरही असे अनेक संघर्ष राजकारणात झालेले दिसतात.

सध्या गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात आणखी एक काका पुतण्यांचा संघर्ष चांगलाच गाजतो आहे, नव्हे सध्या तो अटीतटीवर आलेला दिसतो आहे. गेल्या आठवड्यात तर या संघर्षात पुतण्याने काकावर खुलेआम शरासंधान केलेले बघायला मिळाले. परिणामी येत्या लोकसभा निवडणुकीत भारतीय मतदारांना बहिण भाऊ, नणंद भावजय, किंवा आत्या भाचा अशी लढत झालेली बघायला मिळू शकते असे चित्र दिसत आहे.

होय… ही लढत आहे महाराष्ट्रातल्या पवार कुटुंबातील. महाराष्ट्राच्या राजकारणावर गेल्या जवळजवळ ४५ वर्षापासून आपला वरचष्मा ठेवणारे शरद पवार आणि त्यांचे पुतणे अजित पवार यांच्यातला हा संघर्ष आहे. या संघर्षात आता शरदरावांच्या कन्या सुप्रियाताई सुळे यादेखील मैदानात उतरल्या आहेत. त्याचवेळी शरदरावांचे नातू आणि अजित दादांचे पुतणे रोहित पवार हे देखील सुप्रिया आणि शरदराव यांची बाजू घेत अजितदादांविरुद्ध षड्डू ठोकताना दिसत आहेत. हे सर्व बघता येत्या लोकसभा निवडणुकीत पवार विरुद्ध पवार असा सामना निश्चितच रंगणार हे चित्र स्पष्ट दिसते आहे.

सत्तेसाठी काका पुतण्यांचा संघर्ष हा प्रकार काही नवीन नाही. पेशवे काळात आपला पुतण्या नारायणराव पेशवे यांच्या हातात गेलेली सत्ता आपल्याला मिळावी म्हणून राघोबादादा पेशव्यांनी पुतण्यावरच गारदी घातले होते. हा इतिहास आजही महाराष्ट्र विसरलेला नाही. तसाच हा संघर्ष देखील आहे. मात्र यात सत्ता मिळावी म्हणून पुतण्या संघर्ष करतो आहे. काकांना मात्र सत्ता आपल्याला कन्येकडे सोपवायची आहे. त्याचवेळी जर पुतण्याच्या हातात सत्ता गेली तर तो पुरता डोईजड होईल ही भीतीही काकांच्या मनात आहे्. सगळा काही संघर्ष त्यामुळे सुरू आहे.

या संघर्षावर भाष्य करण्यापूर्वी थोडा इतिहास वाचकांना सांगणे गरजेचे वाटते. आधी नमूद केल्याप्रमाणे शरद पवार हे १९६२ पासून महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय आहेत. १९६७ मध्ये ते आमदार झाले आणि १९७२मध्ये मंत्री झाले .१९७८ मध्ये तत्कालीन काँग्रेस पक्ष सोडून त्यांनी तत्कालीन जनता पक्षाशी हातमिळवणी करत मुख्यमंत्रीपद मिळवले. त्यावेळी पवारांचे ज्येष्ठ नेते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या पाठीत पवारांनी खंजीर खुपसला असा आरोपही झाला होता. आजही पवार हे खंजीर खुपसणारे आहेत असा आरोप त्यांच्यावर केला जातो. नंतरच्या काळात पवारांनी बऱ्याच कोलांटउड्या मारल्या. एकदा काँग्रेस सोडल्यावर पुन्हा काँग्रेसमध्ये आले. सुमारे बारा वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यावर त्यांनी सोनिया गांधींच्या परकीय नागरिकत्वाचा मुद्दा पुढे करून पुन्हा एकदा पक्ष फोडला आणि राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. सोनिया काँग्रेस विरुद्ध त्यांनी निवडणूक तर लढवली मात्र निकाल लागल्यावर काही दिवसातच त्यांनी त्याच काँग्रेसशी हातमिळवणी करून राज्यात सत्ता मिळवली. पाच वर्षांनी काँग्रेसशी हातमिळवणी करून केंद्रातही सत्ता मिळवली. २०१४ मध्ये राज्य आणि केंद्र अशी दोन्ही सत्ता गेल्यावर देखील त्यांच्या कोलाटउड्या अजूनही सुरूच आहेत.

या संघर्ष नाट्यातील दुसरे पात्र म्हणजे अजितदादा पवार, हे १९९० च्या दरम्यान राजकारणात सक्रिय होऊन लोकसभेत आले. १९९५ मध्ये विधानसभेत निवडून आल्यावर पाच वर्ष ते विरोधी पक्षात राहिले. १९९९ मध्ये शरद पवारांनी काँग्रेस फोडून राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यावर तेही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सामील झाले. परिणामी १९९९ मध्येच ते राज्य मंत्रिमंडळात मंत्री देखील झाले. २००४ मध्ये ते राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. आतापर्यंत पाच वेळा ते उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेते झाले आहेत. राष्ट्रवादीतील आक्रमक आणि स्पष्टवक्ते नेते म्हणून त्यांची ओळखही आहे.

या सत्तानाट्यातील तिसरे पात्र म्हणजे शरद पवारांच्या एकुलत्या एक कन्या सुप्रिया सुळे, सुप्रिया सुळे यांचे १९९१ मध्ये सदानंद सुळे यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर सुमारे पंधरा वर्षे त्या राजकारणापासून दूर होत्या. २००६नंतर त्या आधी समाजकारणात आणि नंतर लगेचच राजकारणात सक्रिय झाल्या. शरद पवारांनी आपली प्रतिष्ठा वापरत याच दरम्यान त्यांना लगेचच बिनविरोध निवड करून राज्यसभेत पाठवले. तेव्हापासून त्या राजकारणात सक्रिय झाल्या आहेत.
१९९१ साली लोकसभेत निवडून आलेले अजितदादा यांनी जसे स्वतःचे व्यक्तिमत्व घडवित एक स्वतंत्र नेता म्हणून स्वतःची प्रतिमा निर्माण केली, तशी सुप्रिया सुळे यांना निर्माण करणे अद्याप तरी त्यांना साधलेले नाही. आजही शरद पवारांची कन्या म्हणूनच त्या ओळखल्या जातात. तरीही त्यांना पुढे आणून महाराष्ट्राची पहिली महिला मुख्यमंत्री बनवायचे किंवा केंद्रात जबाबदार खात्याचे मंत्री बनवायचे ही शरद पवारांची इच्छा आहे आणि त्यासाठी त्यांचे प्रयत्नही आहेत.

मात्र कन्येला पुढे नेताना अजित शरद पवारांनी अनेकदा आपले पुतणे अजित पवार यांच्यावर अन्याय केलेला असल्याचे बोलले जाते.हेच नेमके अजित पवारांचे दुःख आहे. त्यांचे हे दुःख इतक्यात बरेचदा उफाळून आलेले दिसते. जे काही संघर्षनाट्य सुरू झाले त्यात पवारांचा राजकीय वारस कोण ?अजितदादा की सुप्रिया सुळे? हा वाद असून त्यात शरद पवारांचे उफाळून येत असलेले कन्याप्रेम आणि त्यामुळे एकूणच त्यांच्यावर होत असलेला धृतराष्ट्री प्रवृत्तीचा आरोप अशी या संघर्षाची किनार आहे.

यापूर्वी शक्य असूनही २००४ मध्ये अजित पवारांना शरदरावांनी मुख्यमंत्री बनू दिले नाही हे अजित पवारांचे दुःख होतेच. त्यात में २०२३ मध्ये जेव्हा शरद पवारांनी निवृत्त होऊन सुप्रिया सुळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बनवण्याचा आणि पर्यायाने त्यांना राष्ट्रीय नेता म्हणून पुढे आणण्याचा घाट घातला गेला तेव्हा अजित पवार अक्षरशः खवळले. इथेच उद्रेकाची ठिणगी पडली..

२ जुलै २०२३ रोजी अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आपले काका शरदराव पवार यांच्याशी सरळ सरळ पंगा घेत पक्ष फोडला. पक्षाच्या ५४ आमदारांपैकी ४० आमदार आपल्या सोबत घेऊन ते सत्ताधारी भाजप शिवसेना शिंदे गट महायुतीत सहभागी झालेआणि स्वतः उपमुख्यमंत्री बनत आपल्या आठ सहकारी आमदारांना मंत्रीपद दिले.हा प्रकार शरद पवारांना फार मोठा धक्का होता. त्यानंतर खरा राष्ट्रवादी पक्ष माझ्यासोबत आहे असा दावा करीत अजितदादांनी स्वतःला पक्षाचा अध्यक्ष घोषित करून घेतले. नंतरच्या काळात त्यांनी काही वेळा जाहीर सभांमध्ये तर काही वेळा पत्रपरिषदमध्ये आपल्या काकांनी आपल्या बहिणीला म्हणजेच त्यांच्या कन्येला पुढे आणण्यासाठी माझी कशी गळचेपी केली याचे अनेक किस्से अजितदादांनी उघड केले. त्याला शरद पवार आणि सुप्रिया सुळे तसेच या बंडामध्ये अजित दादांना साथ न देता शरद पवारांसोबत राहिलेले अजितदादांचे पुतणे म्हणजेच शरद पवारांचे नातू रोहित पवार जे शरद पवारांसोबतच राहीले आणि आजही आजोबांसोबतच आहेत ते अजितदादांवर तोंडसुख घेत त्यांना खलनायक ठरवण्यात आघाडीवर राहून अजित पवारांच्या आरोपांचा प्रतिवाद करीत आहेत..

यात जो काही संघर्ष सुरू झाला आहे तो उभा महाराष्ट्र आज बघतोच आहे. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या एका कार्यकर्ता शिबिरात अजित पवारांनी विधानसभा आणि लोकसभा जागा कशा आणि किती लढावणार याची घोषणा केली आहे. त्यात ते बारामती मतदारसंघातूनही लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघ हा शरद पवारांचा राखीव मतदार संघ मानला जातो. गेली अनेक वर्षे या मतदारसंघातील खासदार कोण ते शरद पवार ठरवत असतात. शरद पवार दीर्घकाळ इथले खासदार होते. नंतर त्यांनी हा सुरक्षित मतदारसंघ आपली कन्या सुप्रिया हिच्या ताब्यात दिला आणि तेव्हापासून म्हणजे सुमारे दहा वर्षांपासून सुप्रिया सुळे इथल्या खासदार आहेत.

आतापर्यंत शरद पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी अजित पवार हे देखील खांद्याला खांदा लावून सोबत असायचे. यावेळी परिस्थिती बदलली आहे. यावेळी अजित पवार तर सुप्रियांच्या विरोधात आहेतच, त्याच वेळी या लोकसभा क्षेत्रात असलेल्या इतर विधानसभा क्षेत्रातही असलेले आमदार हे अजितदादांसोबतच गेलेले आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची अडचण होणार हे स्पष्ट दिसते आहे. तशीही गेल्या पाच वर्षांपासून भारतीय जनता पक्षाने २०२४ मध्ये सुप्रियांना पराभूत करायचे या दृष्टीने या मतदारसंघात पूर्णतः मोर्चे बांधणी केलेली आहे.

अशावेळी अजितदादांनी या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गट लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे. म्हणजे सुप्रिया सुळेंविरुद्ध अजित पवार कोणीतरी तगडा उमेदवार देणार हे नक्की आहे. इथे कदाचित अजित पवारच स्वतः सुप्रिया यांच्या विरोधात लढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे .त्याच वेळी दुसरे नाव अजितदादांच्या सुविधा पत्नी सुनेत्राताई पवार यादेखील रिंगणात उतरू शकतात अशी शक्यता व्यक्त होत आहे. मतदार संघात सुनेत्राताईंचे अशा आशयाचे बॅनर सुद्धा लागलेले आहेत. इतकेच काय तर तीन-चार दिवसांपूर्वी मुंबई मंत्रालयासमोरही बारामतीच्या भावी खासदार म्हणून सुनेत्रा पवारांच्या फोटोसह बॅनर झळकले आहेत. जर काही कारणाने सुनेत्राताई लढू शकल्या नाहीत तर इथे अजित पवारांचे सुपुत्र पार्थ पवार यांनाही रिंगणात आणले जाऊ शकते. विशेष म्हणजे २०१९ मध्येच जसे रोहित पवार विधानसभेत आमदार म्हणून आले तसेच पार्थ पवार यांचीही विधानसभेत येण्याची इच्छा होती. मात्र तिथे शरद पवार आडवे आले असे बोलले जाते. अजितदादांचा शरद पवारांवर याबाबतीतही राग आहेच. त्यामुळे पार्थ पवारांनाही रिंगणात आणले जाऊ शकते ही शक्यता व्यक्त होत आहे. या लढतीत अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरुद्ध आपल्या कुटुंबातील सदस्य उतरवला तर भाजप आपली शक्ती त्या उमेदवाराला देईल असे चंद्रकांत पाटील यांनी जाहीर केले आहे.इतरही जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपले उमेदवार देणार असल्याचे अजितदादांनी जाहीर केले आहे. त्यात शरद पवारांचे खास म्हणून ओळखले जाणारे श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात उमेदवार दिले जाणार हे नक्की झाले आहे.

सुप्रिया सुळे ,श्रीनिवास पाटील आणि अमोल कोल्हे हे तिघेही शरद पवारांचे खास म्हणून ओळखले जातात. त्यामुळे यांचा पराभव हा शरद पवारांचा पराभव मानला जाईल. हे बघता अजित पवार आपल्या काकांचा राजकीय पराभव करायला दंड थोपटून उभे आहेत असे म्हणावे लागते.

शरद पवार आज ८३ वर्षाचे झालेले आहेत. त्यात जवळजवळ पन्नास वर्षांची सक्रिय राजकीय राजकीय कारकीर्द त्यांनी यशस्वी केली आहे. अशावेळी त्यांचा राजकीय पराभव होणे ही त्यांची नमुष्कीच म्हणावी लागेल. मात्र अजितदादांच्या म्हणण्यानुसार त्यांच्यावर काकांनी कन्याप्रेमासाठी वेळोवेळी केलेल्या अन्यायामुळे ते दुखावलेले असल्यामुळे काकांचा पराभव करायचाच या एका ध्येयाने अजित दादा सज्ज झालेले दिसत आहेत.

हे सर्व बघता आता महाराष्ट्रात पवार विरुद्ध पवार हा कौटुंबिक लढा होणार हे जवळजवळ निश्चित झाले आहे. यात काका विजयी होणार की पुतण्या याचे उत्तर आपल्याला मे २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यावरच मिळेल. मात्र या सर्व प्रकारात राजकारणातील एका वजनदार आणि दबंग कुटुंबातील फाटाफूट ही महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला दिसणार आहे. त्याच वेळी अपत्यप्रेम असावे मात्र ते करताना इतर निकटवर्तीयांवर किती अन्याय करावा याचाही विचार करायला लावणारा हा निवडणूक निकाल असेल यात कोणाच्याही मनात शंका नाही.

या निवडणुकीचा आणि संघर्षाचा निकाल काहीही लागो,मात्र हा संघर्ष टाळला असता तर बरे झाले असते असेच महाराष्ट्रातील प्रत्येक सुजाण नागरिक नंतर दीर्घकाळ म्हणत राहील हे नक्की.

वाचकहो पटतेय का हे आपल्याला ..?

त्यासाठी आधी समजून तर घ्या राजे हो ….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here