नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचे नाव देण्याची सर्व स्तरातून मागणी
1 min read
नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_

नवी मुंबईतील विमानतळाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाऐवजी प्रकल्पग्रस्त नेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला असून, बेलापूर येथील सिडकोच्या मुख्यालयाला हजारोच्या संख्येने घेराव घालण्यासाठी प्रकल्पग्रस्त आणि इतर राजकीय पक्षांतील कार्यकर्ते सकाळपासून सिडको कार्यालयाकडे रवाना होत आहेत.
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वादाचा आजचा महत्त्वाचा दिवस असून विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी फौजफाटा वाढवला आहे. जवळपास तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत.आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सिडको मुख्यालयाकडे येणाऱ्या चारही मार्गांची बुधवारपासून नाकाबंदी सुरू केली. त्यासाठी सात हजार पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. या भागात सर्व प्रकारच्या खासगी वाहतुकीला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बंदी घालण्यात आली आहे. हे आंदोलन सर्वपक्षीय असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
दि. बा.पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी आज नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, मिरा भाईंदर, वसई-विरार अशा विविध परिसरातून भूमिपुत्र सिडको भवन परिसर तसेच नवी मुंबई महानगरपालिका परिसरात दाखल झाले आहेत.
दरम्यान, सिडको भवनाला घेराव घालण्यासाठी दि.बा. पाटील कृती समितीच्या नेतृत्वाखाली आंदोलक गर्दी सिडको कार्यालयाकडे जात आहेत. पोलिसांकडून रस्ते बंद करण्यात आले असले, तरी आंदोलकांना अडवलं जात नसल्याचं कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. मात्र, पोलिसांंनी अडवलं, तिथंच ठिय्या आंदोलन केलं जाईल, अशी भूमिका समितीने मांडली आहे.