Home Breaking एआय ची भीती नको , कौशल्यांची जोड द्या , उज्ज्वल भविष्याची दारे...

एआय ची भीती नको , कौशल्यांची जोड द्या , उज्ज्वल भविष्याची दारे उघडा : प्रा.डॉ.किरणकुमार जोहरे

0
2
Oplus_131072

भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक : ९१५८४१७१३१ 

नाशिक : क. टा. महाराष्ट्र न्यूज  ऑनलाईन न्यूज चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क :  आयपासून दूर राहण्यात नव्हे, तर एआय शिकण्यात भविष्य आहे! मूलभूत ज्ञानाला कृत्रिम बुद्धिमत्तेच्या कौशल्यांची जोड दिल्यास विद्यार्थी केवळ रोजगार शोधणारे नव्हे, तर रोजगार निर्माण करणारे उद्योजकही बनू शकतात, एआयमुळे जागतिक पातळीवर ९ कोटीपेक्षा जास्त नवीन रोजगार संधी निर्माण होत आहेत, मात्र एआय जाणणाऱ्या उमेदवारांचा जागतिक दुष्काळ आहे. एआय तंत्रज्ञान विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याची गुरुकिल्ली ठरते आहे. त्यामुळे एआयबाबत खोट्या व अवैज्ञानिक गोष्टी सांगून त्यांना घाबरवू नका असे आवाहनही एआय तज्ज्ञ प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे यांनी केले.

मविप्रच्या कर्मवीर काकासाहेब वाघ कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयात व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ‘कृत्रिम बुद्धिमत्तेचे (एआय) विश्व : उदयोन्मुख करिअरच्या संधी, धोके आणि नवी क्षितिजे’ या विषयावर पिंपळगाव बसवंत येथे आयोजित विशेष व्याख्यानात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ. वसंत कदम होते. व्यासपीठावर यावेळी प्राचार्य डॉ.व्ही बी रसाळ, व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमाचे विभागप्रमुख प्रा. जनार्दन कुशारे, प्रा. निरंजन जाधव, प्रा. मीना जगताप, प्रा. सरला वाटपाडे, प्रा. गायत्री ताकाटे, प्रा. रोहिणी मोरे, प्रा. प्रनुजा भामरे आदी उपस्थित होते. यावेळी प्रा. डॉ. किरणकुमार जोहरे यांचा सन्मान करण्यात आला.

प्रास्ताविकात प्रा. निरंजन जाधव यांनी एआय हे व्यावसायिक शिक्षणासह सर्वच क्षेत्रांतील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे कौशल्य बनल्याचे सांगितले.

पायथन , डेटा विश्लेषण आणि प्रकल्पातून  घडवा भविष्य _

आजचे शिक्षण हे उद्याच्या करिअरचे भांडवल असल्याचे स्पष्ट करत त्यांनी विद्यार्थ्यांना नवकल्पना, कौशल्यविकास आणि उद्योजकतेचे महत्त्व पटवून दिले. मूलभूत विषयांचे ज्ञान भक्कम करा, पायथन प्रोग्रामिंग आणि डेटा विश्लेषण शिका, छोटे प्रकल्प तयार करा आणि शिकलेल्या तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष समस्यांवर उपाय शोधण्यासाठी उपयोग करा, असा कृतीशील संदेश त्यांनी दिला.

त्रपल बन्सल, नवीन राठोड, अंशुमन पात्रो, अंकित रायजादा आणि सागर पाटील यांसारख्या आपल्या उद्योजक विद्यार्थ्यांच्या यशोगाथांचा संदर्भ देत त्यांनी विद्यार्थ्यांसमोर नवकल्पना आणि उद्योगनिर्मितीची प्रेरणादायी उदाहरणे मांडली. कौशल्यांचा आणि तंत्रज्ञानाचा सर्जनशील वापर करून तरुण स्वतःची ओळख निर्माण करू शकतात, असेही त्यांनी सांगितले.

डीपफेकआणि सायबर हल्ल्यांपासून  सावध रहा 

एआयमुळे संधी वाढत असल्या, तरी डीपफेक, ऑनलाइन फसवणूक, सायबर हल्ले आणि काही पारंपरिक नोकऱ्यांच्या स्वरूपात होणारे बदल ही आव्हानेही आहेत. या आव्हानांचा सामना करण्यासाठी तांत्रिक ज्ञानासोबत चिकित्सक विचार, डिजिटल सुरक्षितता आणि जबाबदार वापराची जाणीव आवश्यक आहे. एआय हे केवळ मोठ्या कंपन्यांपुरते मर्यादित नसून, योग्य कौशल्ये, कल्पकता आणि मेहनतीच्या जोरावर सर्वसामान्य कुटुंबांतील तरुण-तरुणींनाही स्वावलंबन आणि उद्योजकतेच्या संधी मिळवता येऊ शकतात, असे डॉ. किरणकुमार जोहरे यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी श्री. प्रशांत कुलकर्णी आणि श्री. शिवप्रसाद गवळी यांनी परिश्रम घेतले. आभार प्रा. मीना जगताप यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here