ज्वलंत : मी हारसुल जेलला राज कैदी आहे माझी काळजी करू नये …. ! नामांतर चळवळीतील माझा जीवघेणा प्रसंग : रवींद्रदादा जाधव

0
82

भारत पवार : मुख्य संपादक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज : जाहिराती , बातम्या आणि पत्रकार नियुक्ती साठी इच्छुकांनी संपर्क करावा. संपर्क : मो.९१५८४१७१३१ 

रवींद्र दादा जाधव यांच्या शब्दातून जळजळीत प्रसंगाचे लेखन _ 

ओझर : क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज वेब चॅनल अँड न्यूज पेपर नेटवर्क : मी आठवीत असतांना औरंगाबादच्या बसस्टॉप समोरील भोईवाड्यातील प्रमिलाताई या बहीणीकडे भेटायला गेलो.लोकमत वृत्तपत्रात नामांतराकरीता मिलींद महाविद्यालय परीसरातील नागसेन वनात प्रा.जोगेंद्र कवाडे सर यांच्या सभेची बातमी एका कोपर्‍यात छापलेली होती ती वाचनात आली.सभेचे ठीकाण त्यांचे घरापासून अर्धा कीमी अंतरावर होते बहीनीला न विचारताच सभेला गेलो.त्या वेळी कश्यप नावाचा जिल्हा पोलीस अधीक्षक याने प्रा.कवाडेसरांना औरंगाबादला सभेकरीता परवानगी नाकारली होती.कारण सर फक्त जातीयवाद्यांना पोलीसांना व काँग्रेसच्या सरकारला शिव्यां देऊनच सभेची सुरवात करायचे.
सभा सायंकाळी सहा सातला सुरु झाली.दिडदोन हजार पोलीस तैनात करण्यात आले होते. मराठवाड्यातुन व औरंगाबाद शहरातील बरीच आंबेडकरी चळवळीतील स्रीपुरुष कार्यकर्ते व ज्येष्ठ नेते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.मि स्टेजच्या अगदी समोरच बसलो होतो.कारण मला प्रा.कवाडे सर जवळुन बघुन त्यांना हात मिळवायचा होता. सभा सुरू होण्याच्या अगोदर त्यावेळेचे दलित मुक्ती सेनेचे औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष भाई चंद्रकांत जाधव (लासुर स्टेशन) यांनी प्रथम प्रास्तविकाला सुरवात केलीच होती.अजुन कवाडेसर स्टेजवर आले नव्हते.तेवढ्यात पब्लिक मधुन घोषणाबाजी सुरू झाली.
“सर…. कवाडे आगे बढो !
हम तुम्हारे साथ है…!!
आणि स्टेजच्या मागील बाजूने अंगावर शाल पांघरून दाढी वाढलेली सफारी ड्रेस घातलेले सर स्टेजवर दाखल झाले मी सुद्धा घोषणेत सहभागी झालो व आम्ही सर्व घोषणा देवु लागलो…
डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो…
कोण म्हणंतय देणार नाय..घेतल्या शिवाय रहाणार नाय
नामांतर झालेच पाहिजे….!!!
तेवढ्यात आम्ही बसलो त्याच्या मागच्या बाजूला गोंगाट सुरू झाला पळापळ धावपळ सुरु झाली.काठ्यांचा आवाज व महिला पुरुषांचा आरडाओरडा, रडणे आसा आवाज सुरू झाला.
काय झालं व काय होतय असा विचार करत असतानाच स्टेट जवळ शंभर दिडशे पोलीस कदाचित एस आर पी असावेत ते हातातील काठ्यानी कवाडे सरांच्या अंगावर तुटून पडले.मि अगदी स्टेजच्या जवळ असल्याने सर्व बघत होतो.तेव्हा कुणीतरी दोनतीन कार्यकर्ते सरांच्या अंगावर पडुन त्यांना पडणारा मार स्वताच्या अंगावर झेलत होते.
मी विचार केला “लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगायला हवा” म्हणुन मी सुद्धा रक्तबंबाळ झालेल्या कवाडे सरांच्या अंगावर पडलो तेव्हा पहिल्या दोनचार काठ्ये पाठीवर व दोनचार डोक्यात हातावर बसल्या माझेही डोके फुटले डावा हात फॅक्चर झाला.मला एका पोलीसाने अलगद उचलले मारत असलेल्या पोलीसाच्या तावडीतून सोडवुन एका कोपर्‍यात ठकलुन दिले. नागसेनवनात एकदिड हजार स्रिपुरुष विव्हळत होते.स्टेजच्या मागील एका बाजूला नाला होता त्या नाल्याच्या दिशेने बरेच लोक जिव घेऊन पळत होते.मि त्यांच्या मागे पळु लागलो
आम्ही नाला पार करत करत घाटी हाऊस्पीटल च्या जवळपास पोहचलो तेव्हा मला नासिकचे आंबेडकर नगरातील दिवंगत बाळासाहेब गांगुर्डे, दिपक नंन्नावरे,यशवंत उर्फ टील्लु साळवे,दिवंगत शशीकांत आहीरे,राजाभाऊ (गाईड) गांगुर्डे, दिवगंत शशीभाई गवारे(भगुर) असे भेटले नासिकचे असल्याने मला जरा बर वाटल.पण त्यानांही पोलीसांनी मारलेले होतेच.आम्ही पोलिसांच्या तावडीतून सुटका झाली याच आनंदात रस्त्याच्या कडेने जात होतो.तेव्हा रात्रीचे 12 वाजले होते.
तेवढ्यात सभोरुन सफेद बनीयन व हाप खाकी चड्डी घातलेले चारपाच तरुण पोर आली व आम्हाला जयभीम म्हटले आम्ही सर्वजण एकाच आवाजात त्यांना जयभीम म्हणुन प्रतिसाद दिला.तेव्हा ते आम्हाला म्हटले तुम्ही कुठले आम्ही नासिकचे आहोत.त्यांना विचारले तेव्हा म्हटले आम्ही परभणीचे.
ते आम्हाला म्हटले नागसेन वनातील पटांगणावर नासिकचे नेते तासनेसाई नंन्नावरे ह्यांना खुपच मार लागल्याने ते विहीरीच्या कडेला पडलेले आहेत.त्यांना वाचवा नाहीतर त्यांचे काही खरे नाही.
आमच्या बरोबर असलेले दिपकभाई नंन्नावरे हे तानसेनभाईचे सख्खे भाऊ त्यामुळे आम्ही पाच सहा लोक पुन्हा नाल्याच्या दिशेने सभेच्या नागसेन वनाकडे निघालो आमच्या मागे मागे परभणीचे भिमसैनिक ज्यांनी तानसेनभाईचा निरोप दिला ते होते.आम्ही ऐन नाल्याच्या मध्यभागी पोहोचलो तेव्हा समोरुन काळोखातुन काही लोक आमच्या दिशेने येतात असे दिसले अजुन थोडे चालत गेलो तर हातात काठ्या घेवुन दहापंधरा पोलीस आमच्या दिशेने जोरात येत होते.आम्ही सर्व माघारी फीरलो व धुम ठोकून पळु लागलो तेव्हा परभणीचे साठ आठ लोकांनी त्यांच्या हातातील काठ्यानी आम्हाला मारण्यास सुरवात केली तोपर्यंत पोलीस पोहचले होते त्यांनीही जिवजाऊस्तोवर आम्हाला खाली पाडुन काठ्यानी व लाथाबुक्यनी बेदम मारले.व म्हायचे नामांतर पाहिजे काय..तेव्हा समजले ते परभणीचे भिमसैनिक नसुन साध्या गणवेशातील पोलीस आहेत.
आम्हाला पकडून नागसेनवनात असलेल्या पोलीस गाड्यांमध्ये ठेवून लगेच सिटी पोलीस ठाण्यात जमा केले.आम्ही रक्तबंबाळ झालो होतो व माझा डावा हातही फॅक्चर झाला होता.पोलीस ठाण्यात अगोदरच शेपाचशे स्रिपुरुषांना आणलेले होते.
मी त्यांना बघीतल्यावर माझ्या जिवातजीव आला.
रात्रभर आमचे नाव पत्ता व ईतर माहीती लीहीत होते.
सकाळी माझ्यासह ज्यांना जास्त मार लागला आहे त्यांना उपचारासाठी घाटी हाऊस्पीटल मध्ये नेले.
व लगेच परत पोलीस ठाण्यात आणले.
दुपारी दोनच्या सुमारास कोर्टात नेले आम्ही तरीही बाबासाहेबांच्या व नामांतराच्या नावाच्या घोषणा देत होतो. कोर्टातुन आम्हाला न्यायलयीन कस्टडी मिळाली व आमची रवानगी हारसुल जेल मध्ये करण्यात आली.आमच्या बरोबर कवाडे सर सुद्धा होते.विषेष म्हणजे या सर्व राजकीय कैद्यांमध्ये वयाने सर्वात लहान मिच होतो कारण मि आठवीत होतो.
आणि अजुन एक विषेश माझा व कवाडे सरांचा म्हणजे आमच्या दोघांचेच हात गळ्यात टांगलेले होते.ठरावीक लोकांची डोकी फुटलेली काहीना मुक्का मार लागलेला.
हारसुल जेल मध्ये आपले एकुण आठशे पुरुष व पांचशे महीला होत्या.
आम्ही आठशे पुरुष एकाच बॅरेक मध्ये व स्रिया वेगळ्या पण एकाच बॅरेक मध्ये.
रोज सकाळी बुध्द वंदना व रोजच भाषणे करायचो.
वहीपेण घेवून सर्वाचे पत्ते घेण्याचा उपक्रम मी सुरु केला.सर्वानी ओळखी करून घेतल्या.
महाराष्ट्रातुन आलेल्या सर्वांना मी कुतूहलाचा विषय होतो.ईतका लहान असुनही व ईतका मार लागला तरीही व जेलमध्ये असतांना ही चेहर्‍यावर दुक्ख नाही.प्रसंन्न चेहरा व हसतमुखाने सर्वात जावुन सुखदुखाच्या चर्चा….
आम्ही सर्व भिमसैनिक एका रांगेत पंगत धरुन जेवणाकरीता बसायचो.कुणीतरी धंम्मपद म्हणायचे व नंतरच आम्ही सर्व जेवन करायचो.मी मात्र कवाडे सरांच्या मांडीलामांडी लावुन बसायचो. खुप मज्जा यायची.
सरांनी दुसर्‍या दिवशी सर्वांना पोस्टकार्ड वाटले. मीही बहीनीला पत्र लिहून मि खुषाल आहे व नामांतर चळवळीत हारसुल जेलला राजकैदी आहे माझी
काळजी करु नये अश्या मजकुराचे पत्र टाकले.
मेव्हण्याने बहीनीला खुप बोलणे केले ते सहाजीकच होते.
शेवटी माझ्या बहिणीच्या भाचेजावई खंदारे वकिलाने एक आठवड्याने माझा जामीन मंजूर केला.सर्वात पहीला जामीन माझा झाला कारण मि वयाने लहान होतो व आम्हाला वय न विचारता पोलीसांना अंदाजानेच जास्त वय लावले होते.माझे मेव्हण्याने ओझरहुन आठवीचे बोनाफाईड प्रमाणपत्र आणुन माझा जामीन लवकर झाला.
जेव्हा माझे पाॅकीट आले तेव्हा मला आनंद होण्याऐवजी रडु आले.ईतक्या गाजलेल्या निष्टावंत आंबेडकरी चळवळीतील प्रा.जोगेंद्र कवाडे सर,तानसेनभाई,गोपाळराव आटोटे,अॅड.जे के नारायणे,चंद्रकांत जाधव,पडघण गुरुजी,नामदेव रबडे, बाबुराव शेजवळ, नामदेव खोब्रागडे, चिंतामणभाई गांगुर्डे, रत्नाताई मोहोड अशा रथी महारथी च्या सहवासात एक आठवडा घालवला तो अजुनही हवा होता पण जेल अधिकारी मला ठेवू शकत नव्हते.
नंतर नासिक जिल्ह्यातील ओझर (मिग) या स्वताच्या गावी आलो लवकरच तरुण व बाल वयातील मंडळी ची बैठक घेऊन गावात दलित मुक्ती सेना स्थापली बोर्ड लावला सर्व नेत्यांना सभेला बोलवले….व दलित चळवळीला सुरवात केली तेव्हा फक्त शहर सरचिटणीस होतो.नंतर अनुक्रमे शहर अध्यक्ष,तालुका अध्यक्ष,जिल्हा महासचिव,ऐक्यात सात वर्षे जिल्हा अध्यक्ष, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष, आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चा राज्य उपाध्यक्ष म्हणून काम करतो ते ही त्याच जोमाने….आजही जुन्या हजारो घटना आठवल्यावर अंगावर रोमांच व शहारे उठतात…….
म्हणून माझ्या अनुभवावरून सांगतो की
कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असताना जसजशी प्रगती सुरु होते तसतसा छुपा विरोध हा वाढू लागतोच;
सुंदर वेलीच्या खोडावर बांडगुळ वाढावा तसा. हा निसर्गाचाच नियम आहे.
पण आपल्याला त्याची पुसटशीही कल्पना नसते. मग तुमची प्रगती डोळ्यात सलते आणि डोक्यात भनाणु लागते तेव्हा कारस्थानांच्या बिया पेरल्या जातात. खुरटय़ा विचारांचे कावळे एकत्र जमू लागतात आणि व्रणार्त शिशूच्या पंखावर चोच मारण्याची संधी शोधू लागतात.
मग तुमच्यावर आरोप होतात- गैर व्यवस्थापनाचे, गैर कारभाराचे, भ्रष्टाचाराचे ! तुम्ही भांबावता, हडबडून जाता. कारण हा हल्ला तुम्हाला अपेक्षित नसतो. आणि मग तुम्ही प्रत्युत्तराची तयारी करू लागता. शब्दाला शब्द वाढतात…. त्यांची धार तिखट होते.. विरोधकांना आयते खाद्य मिळते. आणि नेमक्या याच क्षणी तुमच्या हातून आजवर न झालेली गफलत होऊ शकते.
सत्यनिष्ठ, प्रामाणिक लोक कामाच्या ओझ्याने दबून जात नाही ; पण मिथ्या आरोपांच्या हल्ल्यामुळे खचून जातात. त्यांच्या आत्मविश्वासाला तडा जातो आणि मग प्रत्युत्तरे देण्याच्या घाईगर्दीत तो आजवर सांभाळलेले संतुलन गमावून बसतो. नुकसान हे या क्षणाला होते.
त्यामुळे जेव्हा तुम्ही अर्थशून्य नौटंकीला सामोरे जाल, विषारी टीकेचे फूत्कार ऐकावे लागतील, तुमच्याबद्दलची व्यक्त होणारी मते चुकीच्या मार्गावर दाखविलेल्या दिशांचे प्रतिबिंब ठरू लागतील, तेव्हा ताठ मानेने उभे राहायचे आणि एकही शब्द न बोलता तेथून निघून जायचे, यातच खरे शहाणपण आहे. हा पळपुटेपणा नाही. ही पाठ दाखविण्याची प्रवृत्तीही नाही.तर ही शहाणी, समंजस पणाची, सन्मानाची भूमिका आहे. प्रत्युत्तर देणे, आवाज चढवणे म्हणजे एका अर्थी होणाऱ्या आरोपांना स्वीकृती देण्यासारखेच ठरते. प्रत्येक प्रत्युत्तराची एक वेळ असते. अपमान विसरायचे नसतात, तर ते मनाच्या हळव्या कोपऱ्यात जपायचे असतात. त्यांची बोच रोज लागता कामा नये ; पण त्यांचा सल मात्र खोलवर दडलेला बरा. कारण तो पुढच्या वाटचालीला मार्गदर्शक ठरतो.
यश पचविणे एक वेळ सोपे; पण आरोप रिचवणे खूप कठीण. ‘ हेचि फल काय मम तपाला ‘ ? याचा वारंवार मनाच्या खिडकीत येणारा प्रत्यय सहन करणे सोपे नाही.
कोणत्याही मॅनेजमेन्ट स्कूलमध्ये हे शिकविले जात नाही. मग हे शिकायचे कसे? वेळ आणि अनुभव यापेक्षा मोठे गुरू नाहीत. आरडा ओरड करायला शक्ती लागत नाही, ती शांत राहायला लागते. अशावेळी बाळगलेले मौन हे तुमच्या दुर्बलतेची निशाणी नसून तुमच्या आत्मिक शक्तीचा तो साक्षात्कार आहे. आणि ही शक्ती एका दिवसात येत नाही. तिचा ‘थेंबे, थेंबे’ संचयच करावा लागतो. तुमच्या निघून जाण्यात तुमचा पराभव नसतो, तर ती तुमची प्रगल्भता असते.
आरोप करणाऱ्यांचे पितळ उघडे पडतेच, आणि कालांतराने इतरांनाही सत्य समजते. तोपर्यंत तुम्ही बरीच प्रगती केलेली असते.
शेवटी काय तर ”आपण प्रत्येकाच्या दृष्टीने चांगले असू शकत नाही,, ”पण आपण त्यांच्यासाठी उत्कृष्ट आहोत जे आपल्याला समजतात,, ”माणसाने स्वत:च्या नजरेत चांगलं असलं पाहीजे,, ”लोक तर महापुरूषांना पण नाव ठेवतात. मी का टीकलोय तर प्रथम मी शंभर टक्के निर्व्यसनी व कट्टर आंबेडकरप्रेमी आणि विरोधक यांना न जुमानता सातत्याने दर आठवड्याला एक कुठलेही आंदोलन मोर्चा उद्घाटन उपोषण निदर्शने करतोच तिच अॅनर्जी आहे.

आपला भिमसैनिक
आयु.रविंद्र भास्करराव जाधव
(राज्य उपाध्यक्ष)
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)
ओझर (मिग) ता.निफाड, जि.नासिक
मोबाईल : ९४२३१२१४११
: ९४२३३८८४४४

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here