भारतराज पवार : राज्य मुख्यसंपादक आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क: मो. ९१५८४१७१३१
देवळा : कटा महाराष्ट्र न्यूज ऑनलाईन वेब चॅनल ( संपूर्ण महाराष्ट्रा साठी ) अँड न्यूज पेपर नेटवर्क _
मी भरुन घेतो सारे हृदयाच्या काठोकाठ
शब्दातून देताना का
पाझरता होतो माठ ‘
या कवी खलील मोमीन यांच्या काव्यपंक्तीचा मला नेहमी प्रत्येक येत राहतो कवीने निसर्गाचेऔदार्य व्यक्त केलेले असले तरी पण काही व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा मागोवा घेताना आणि शब्दातून मांडताना मनाची अवस्था पाझरणाऱ्या माठासारखीच होते .असेच एक देवळा गावातील सर्वसामान्य व्यक्तिमत्व म्हणजे कर्मवीर रामरावजी आहेर जे आपल्या कार्यातून उक्तीकृतीतून समाजमनावर आपला ठसा कायम उमटवू शकले त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा ३१व्या स्मृतिदिनानिमित्त घेतलेला मागोवा. रामरावजी आहेर यांचा जन्म८ जून १९३२रोजी खेडेगावात मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. पाच बहिण भावंडात ते मोठे त्यांना अण्णा नावाने घरात संबोधले जात असे, अण्णा म्हणजे मोठा भाऊ ,ही भूमिका त्यांनी आपल्या कुटुंबात यशस्वीपणे साकारली .शालेय शिक्षण झाल्यावर एस.टी.सी. व एच. एस. एस. परीक्षा पास झाल्यावर ज्ञानदानाचा शिक्षकी पेशा त्यांनी स्वीकारला .सुरुवातीला काही वर्ष नूतन विद्यालय त्र्यंबकेश्वर येथे नोकरी करून ते देवळा ह्या आपल्या कर्मभूमीत श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे शिक्षक म्हणून सेवेत स्थिरावले. शिक्षकाची नोकरी करताना त्यांनी देवळा आणि परिसरात स्वतःची ओळख निर्माण केली.’ रामराव सर’ या नावाने लोकमाणसात त्यांनी वलय निर्माण केले .देवळा ग्रामपंचायतीच्या सदस्य पदापासून आपल्या राजकीय प्रवास त्यांनी सुरू केला. लवकरच देवळा ग्रामपंचायतच्या सरपंच पदी त्यांची बिनविरोध निवड झाली.देवळा गावाच्या विकासासाठी त्यांनी तळमळीने काम केले .सामान्य माणसाच्या उन्नतीचा विचार त्यांनी कृतीत आणण्याचा नेहमीच प्रयत्न केला .देवळा ग्रामपंचायतला आदर्श ग्रामपंचायत हा बहुमान त्यांच्या कार्यकाळात प्राप्त झाला तो केवळ ग्रामविकासाच्या योजना सामान्यांपर्यंत नेण्याचे काम त्यांनी केले म्हणूनच.
शिक्षण, राजकारण, समाजकारण ही त्यांची आवडती क्षेत्र होती. राजकारणातून समाजकारण करताना त्यांनी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश केला. कळवण पंचायत समिती सदस्य व सभापती तसेच सलग दोन वेळा नाशिक जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून त्यांना जनतेने निवडून दिले. जिल्हा परिषदेत शिक्षण व अर्थ सभापती म्हणून नियुक्ती झाल्यावर जिल्ह्याची सेवा करण्याची अपूर्व संधी चालून आल्यावर शिक्षण क्षेत्रातल्या समस्या त्यांनी सोडविल्या. सर्व जाती धर्माच्या मुलांना शिक्षण मिळावे यासाठी खेड्यापाड्यात शिक्षणाच्या सोयी व उत्तम शिक्षक वर्ग जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्यांनी उपलब्ध करून दिला. शेतकरी हा देखील त्यांचा जिव्हाळ्याचा विषय राहिला. शेतीसाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा परिषदेच्या माध्यमातून पाझर तलावाची साईड जिथे असेल तेथे सर्वे करून देवळा परिसरात त्या काळात त्यांनी ६०ते७० पाजर तलाव व नालाबंडिंग पूर्ण करून घेतले. देवळा तालुक्यातील वार्शी येथिल कोलती नदीवरील लघु प्रकल्प सुद्धा याचे धोतक आहे. खेड्यातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमस्वरूपी सुटावी म्हणून सामूहिक नळ पाणीपुरवठा योजना देवळा पंचक्रोशीत सुरु करून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. देवळा एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे प्रमुख म्हणून सूत्र हाती घेतली तेव्हा संस्थेची फक्त एकच शाखा कार्यरत होती. त्यांनी संस्थेच्या शाखा विस्तारास प्रारंभ केला .जिल्ह्यात बागलाण ,कळवण ,मालेगाव या तालुक्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालये सुरू करून गोरगरीब सामान्य कष्टकऱ्यांच्या मुलांना शिक्षण प्रवाहात सामील करून घेतले. तत्कालीन कळवण तालुक्यात महाविद्यालयीन शिक्षणाची सोय नव्हती तेव्हा उच्च शिक्षणासाठी मुला-मुलींना सटाणा या ठिकाणी जावे लागे.गरीबीमुळे अनेक मुले मुली महाविद्यालयीन शिक्षणापासून दुरावत असत .ही गोष्ट रामराव आहेर यांच्या नजरेतून सुटली नाही. १९७८ मध्ये देवळा येथे वरिष्ठ महाविद्यालय सुरू करून हजारो खेड्यापाड्यातील मुला-मुलींना वरिष्ठ शिक्षणाचे द्वार त्यांनी खुले करून दिले. केवळ महाविद्यालय सुरू करून न थांबता अध्यापनासाठी उत्तमोत्तम प्राध्यापक वर्ग उपलब्ध करून दिला . आज अनेक सामान्यांची मुले वरिष्ठ शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत जाऊन विविध क्षेत्रात सेवेत आज कार्यरत आहेत. जिल्ह्यातील अनेक संस्थांमध्ये विविध पदांवर त्यांना स्वकर्तृत्वातून काम करण्याची संधी लाभली .त्या पदांचा वापर त्यांनी सामान्य माणसांच्या कल्याणासाठी केला. त्यांच्या राजसत्तेला सामान्य माणसांच्या कळवळ्याचे लेणे चढले होते हा विचार देखील त्यांच्या बाबतीत लागू पडतो .खूप मोठ्या राजकीय पदाला ते गवसनी घालू शकले नाहीत .त्याला तत्कालीन परिस्थिती कारणीभूत असेल पण नाशिक जिल्ह्याच्या राजकिय, शिक्षण ,समाजिक सहकार या क्षेत्रात त्यांनी त्यांच्या कार्यकर्तृत्वाची मोहर उमटवली हे निश्चित. त्यांच्या कार्याचे स्मरण १ जानेवारी ह्या त्यांच्या स्मृतिदिनी झाल्याशिवाय राहत नाही. कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
__ लेखक / शब्दांकन : बापू रौंदळ ( सेवानिवृत्त उपप्राचार्य )





