September 25, 2023

विश्ववंदनीय जगद्गुरु विद्रोही संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आम्हाला समजू दिलेच नाहीत

1 min read

पुणे _ क स मा दे टाइम्स” महाराष्ट्र न्यूज “_जगदगुरु संत तुकाराम महाराज यांच्या जयंती निमित्ताने विशेष लेख _
महाराष्ट्र हि संताची भुमी हे सर्वांच्या परिचयातले आहे.इतकी शतके गेली तरी आजही संताच्या कार्याचा प्रभाव जनमानसावर तसाच टिकुन आहे,हे वेगळे सांगायची गरज नाही.शहर असो वा गाव,वाडी असो वा तांडा किंवा कोणताही भाषिक असो तो संतांना पुचतो भजतो मानतो समस्त चांगुलपणाचे आणि नैतिकतेचे जनकच संत असे मानणारा वारकरी वर्ग आहे..!
संत म्हणजे समाजसेवा,संत म्हणजे समानता,संत म्हणजे त्याग आणि समर्पण हे सर्वांना माहिती आहे.पण संत म्हणजे साहित्य हे माञ न चर्चिले गेलेले संताचे अंग.न चर्चिला विषय.भारतातील सर्वच संत उत्तम साहित्यिक होते…

जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे निर्भिड व एका अर्थाने विद्रोही संत कवी होते. विशिष्ट वर्गाची पारंपरिक मक्तेदारी असलेला वेदांत तुकोबांच्या अभंगवाणीतून सामान्य जनांपर्यंत प्रवाहित झाला. ‘अभंग म्हटला की तो फक्त तुकोबांचाच एवढी लोकप्रियता त्यांच्या अभंगांना मिळाली संत तुकारामांची भावकविता म्हणजे अभंग हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचे महान द्योतक आहे वारकरी साहित्यिक अभ्यासक सामान्य रसिक आजही त्यांच्या अभंगांचा अभ्यास करतातच तसेच त्यांचे अभंग खेड्यातील अशिक्षित लोकांच्याही नित्य पाठात आहेत.आजही ही लोकप्रियता ‘अभंग’ आहे, वाढतेच आहे…
‘वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा। इतरांनी वहावा भार माथा।।’ असे परखड वक्तव्य तुकोबाराय अभिमानाने व्यक्त करतात. ‘तुका तरी सहज बोले वाणी। त्याचे घरी वेदांत वाहे पाणी।।’ भक्ती -ज्ञान-वैराग्य याने ओथंबलेली संत तुकारामांची अभंगवाणीपरब्रह्माच्या अद्वैताची मनोमन पूजा बांधते. ते विटेवरचे सावळे परब्रह्म सगुण साकार होऊन, स्वत:ला तुकोबांच्या अभंग-भक्तिरसात बुडवून घेण्यात धन्यता मानते..
या विश्वामध्ये एकमेव संत ज्यांचा जन्म तर भुतलावर झाला परंतु त्यांना संपविल्यानंतरही त्यांच्या अस्थि किंवा राख मात्र या भुतलावर कुठे असल्याचा पुरावाच पुसून टाकल्या गेला एवढा धसका त्यांच्या घातपाती मृत्यूनंतर या शोषकांनी त्यांच्या अस्थिच्या राखेचा घेतला होता.कारण अभंगरुपी घणाघाती वार शोषकांना सोसनं असह्य झाल्यामुळे या अभंगगाथा इंद्रायणी नदीत बुडवून नष्ट करुनही त्या जशाच्या तशा शोषित भारतीयांच्या मुखात राहू शकल्या एवढी ताकद या अभंगरुपी वारात होती,शोषकांवर वार करणारे तुकोबांचे लाखो साहित्य वारकरी आजही तयार होवून या शोषकांवर वार करत आहे.जर का तुकोबांच्या अस्थि या अमुक ठिकाणी आहे एवढे जरी आम्हा साहित्यिकना वारकऱ्यांना माहित असते तर त्या समाधीला नतमस्तक होवून आम्हा साहित्यिकामध्ये वारकऱ्यांमध्ये या शोषकांविरोधात विरश्री संचारली असती व या शोषकांची ही शोषीतव्यवस्था उधळून लावली असती एवढी ताकद त्यांच्या या अस्थित होती याची जाणीव या शोषकांना नक्की होती त्यामुळे त्यांच्या समाधीपर्यंत कोणी पोहचूच नये याची व्यवस्था त्यांनी “पुष्पक विमान वैकुंठ” हे भ्रामक शस्त्र आम्हा बहूजन समाजावर वारकऱ्यांवर चालवून आम्हांला पराभूत केले. याची प्रचीती देहूला गेले असता प्रत्येक बहूजन समाजाला वारकऱ्याला झाल्याशिवाय राहत नाही…
प्रत्येक भावीक संत महापुरुषांच्या समाधीस्थळाला नतमस्तक व्हायसाठी अधीर झालेला असतो.कितीतरी त्रास सहन करत तिथपर्यंत जावून त्या समाधीवर डोक टेकवून धन्य होत असतो परंतु आम्ही बहूजन समाज व वारकरी देहु ला गेलो असता तुकोबांच्या समाधीवर नतमस्तक होण्यासाठी मन व्याकुळ होवून भिरभिर फिरते पण माझ्या तुकोबाच्या अस्थि समाधीरुपानं कुठेच दिसत नाही या अतीव दुःखानं खिन्न मनाने तुकाबांचे वास्तव्य असलेल्या घराचं व त्यांचा घातपात ज्या इंद्रायणीने बधितला तिच्या घाटाचं दर्शन घेवून परतावे लागते.देहुवरुन माघारी फिरतांना मनोमन एकच विचार येतो की माझ्या तुकोबाच्या अस्ती या मातीत आहे एवढं जरी आम्हा साहित्यिकना वारकऱ्यांना माहित असतं तर इथून परतणारा प्रत्येक भावीक स्फुरण घेवून हा शोषकांचा डोलारा उध्वस्त करणारा सच्च्या साहित्य व वारकऱ्याच्या रुपान तुकोबाचा सैनिक होवून शोषकांना परास्त करुन त्यांचा डोलारा उध्वस्त केला असता यात यत्किंचितही शंका नाही.परंतु आम्हा साहित्यिकना वारकऱ्यांना पुष्पक विमानाने तुकोबांचे वैकुंठ गमन झाल्याच्या भ्रामक कल्पनात गुंतवून साहित्याच्या वारकऱ्यांचा वार बोथड केल्या गेला. हे शातीर शोषक त्यांच्या कारस्थानात यशस्वी झाले याची आम्हा जाणीव होवू दिली नाही..
मी वेदांचा अंकित नाही,भेदभाव सांगणारा वेदांचा भाग गाळून उरलेला भाग मी प्रमाण मानतो,सर्वांच्या ठिकाणी समत्व पाहणे हे ब्रम्हाचे स्वरूप न जाणणारा पंडित दुराचारी होय,अशी भूमिका त्यांनी घेतली.सर्वांचे चर्म व मांस समान असताना भेदभाव कशाच्या आधारे करायचा,वाण्याच्या दुकानातून गूळ घ्यायचा असेल तर त्याची जात व कूळ कशाला विचारायचे,गावाचा मोकाशी हलक्या जातीतील असला तर त्या कारणाने त्याची आज्ञा मानायची नाही काय,असे प्रश्न त्यांनी विचारले.महार व्यक्तीला स्पर्श झाल्यामुळे ज्याला राग येतो तो काही खरा ब्रम्हज्ञानी ब्राम्हण नव्हे,त्याने देहान्त प्रायश्र्चित घेतले तरी त्याचे पाप फिटत नाही,असे त्यांनी म्हटले.त्यांनी सोवळ्या-ओवळ्याच्या परंपरागत कल्पना नाकारल्या आणि जो परद्रव्य व परनारी यांच्या बाबतीत सोवळा असतो तोच खरा सोवळा,अशी नैतिक कसोटी सांगितली.जो जानवे व शेंडी यांच्याबरोबरचा संबंध तोडेल,त्याला कसलीही बाधा हाेणार नाही,असे म्हटले…
विधिनि षेध यज्ञ श्राध्द पूजा भविष्यकथन शुभाशुभ नवस कौल योग समाधी उपवास तीर्थयात्रा वनवास गुहेतील ज्ञान,संन्यास,मोक्ष,यांचे परंपरागत स्वरूप नाकारून त्यांच्यापेक्षा शुद्ध भावना व शुद्ध आचरण यांना खरे महत्व असायचे सांगितले.त्यांचा ईश्वरही पारलौकिक मूल्यांवर नव्हे, तर माणूसकीवर आधारलेला होता.रंजल्या -गांजल्या लोकांना जो आपले म्हणतो,तो खरा साधू आणि देव अशा साधूजवळच राहतो,असे त्यांनी म्हटले.देवपूजा करताना असे संत घरी आले असता देवांना सारून या संतांची पूजा करावी,असे त्यांनी लोकांना सांगितले.
थोडक्यात म्हणजे समाजव्यवस्थेला न्यायाचे अधिष्ठान देऊन तिचे निर्मलीकरण करण्यासाठी त्यांनी रात्रंदिवस युध्द केले आणि तत्वासाठी,काही मूल्यांसाठी स्वत:च्या हातांनी एका समाजाच्या वैराचा ज्वालामुखी स्वत:च्या उरावर ओढवून घेतला…!
अशा महान जगद्गुरु विद्रोही संतश्रेष्ठ कवींना त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन..🚩💐🙏🏻
लेखक : शब्दांकन , कवी _श्री. संतोष शकूंतला
आत्माराम बादाडे
जगतगुरु तुकोबाराय साहित्य परिषद,
महाराष्ट्र राज्य,जिल्हाध्यक्ष पुणे .,

* महाराष्ट्रातील घराघरातील सर्व वाचकांच्या मनामनात व घराघरात पोहोचलेले आणि वाचकांनी पसंत केलेले कसमादे टाइम्स “महाराष्ट्र न्यूज ”  साठी बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क करा. तसेच महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी तसेच तालुका आणि महानगर या ठिकाणी तात्काळ पत्रकार नेमणूक करणे आहेत पत्रकारितेची आवड लिखाणाची आवड असणाऱ्या इच्छुकांनी संपर्क करावा ,भारत पवार ,मुख्य संपादक “महाराष्ट्र न्यूज ” मो.9158417131

 

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.