नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुकीपूर्वीच वातावरण गंभीर ,भाजप नगरसेवकांना पोलिसी खाक्या ?
1 min read


नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_ नवी मुंबई महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकांपूर्वीच येथील राजकीय वातावरण दिवसेंदिवस गंभीर होत आहे. भाजपच्या नगरसेवकांविरोधात पोलिस बळाचा विनाकारण वापर करण्यात येत आहे. नवी मुंबईत राजकीय वातावरण गढूळ करण्याचा काही पक्षांचा प्रयत्न असल्याचे चित्र आहे. पण पोलिसांनी महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखाली काम करू नये, अन्यथा भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशारा विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त बिपिन कुमार सिंह यांची या संदर्भात भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना दिला.

नगरसेवक व नागरिकांमध्ये भय निर्माण होऊ नये ही पोलिसांची जबाबदारी आहे. त्यानुसार पोलिसांनी पावले उचलावीत. मात्र सरकारच्या दबावाखाली येऊन पोलिसांनी भाजपविरोधी राजकारण केल्याचे दिसल्यास किंवा तसे काही पुरावे मिळाल्यास भाजप आक्रमक भूमिका घेईल असा इशाराही दरेकर यांनी दिला. दरम्यान गेल्या पंधरा दिवसात भाजपच्या पाच नगरसेवकांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली. त्यापैकी तीन नगरसेवकांनी शिवसेनेत आणि दोन नगरसेवकांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे भाजपमध्ये खळबळ उडाली आहे. भाजप नेते गणेश नाईक यांच्या वर्चस्वाला हा धक्का असल्याचं मानलं जात होतं. नगरसेवकांनी बंड केल्याने नाईकही सक्रिय झाले असून त्यांनी भाजपमधून गेलेल्यांना नांदा सौख्य भरे म्हणत टोला लगावला आहे. त्याच पार्श्वभूमीवर दरेकर यांनी नवी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचं बोललं जात आहे.





