September 21, 2023

अधिक कृतिशील होऊन स्वच्छता विषयक कामे करण्याचे आयुक्त अभिजित बांगर यांचे आदेश

1 min read

नवी मंबई – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज ” प्रतिनिधी_. स्वच्छतेत मागील वर्षी देशात तिसरा क्रमांक आला ही बाब गृहीत न धरता स्वच्छता ही नियमित करीत राहण्याची गोष्ट असल्याने त्याबाबत सतर्क राहून काम करीत राहणे हाच पर्याय असल्याचे स्पष्ट करीत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी युध्दपातळीवर कालमर्यादीत स्वच्छता कामे करावीत असे निर्देश दिले.

‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ मध्ये देशात प्रथम क्रमांकाचे ध्येय नजरेसमोर ठेवून सामोरे जात असताना कामाची निश्चित दिशा स्पष्ट करण्यासाठी दोन्ही परिमंडळांचे उपआयुक्त, सर्व विभागांचे नोडल अधिकारी, आठही विभाग कार्यालयांचे सहा. आयुक्त तथा विभाग अधिकारी, कार्यकारी अभियंता यांच्यासह सर्व स्वच्छता अधिकारी, स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक, उपअभियंता, कनिष्ठ अभियंता यांची संयुक्त बैठक आयोजित करण्यात आली होती.

याप्रसंगी आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी, अतिरिक्त आयुक्त श्रीम. सुजाता ढोले, शहर अभियंता श्री, सुरेंद्र पाटील, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे यांच्यासह सर्वांनाच स्वच्छतेमध्ये सुधारणेच्या दृष्टीने प्रत्यक्ष स्थळभेटी देऊन स्वच्छताविषयक पाहणी करण्याचे व त्यामध्ये सुधारणेच्या अनुषंगाने तत्परतेने बदल करण्याचे निर्देश दिले.

शहर स्वच्छतेकडे लक्ष देताना महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये योग्य समन्वय राखला जावा, जेणेकरून कामाला गती मिळेल असे स्पष्ट करीत आयुक्तांनी स्वच्छता हे आपले प्राधान्य आहे हे लक्षात ठेवून प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करावे असे सूचित केले.

स्वच्छतेप्रमाणेच शहर सुशोभिकरणाकडेही विशेष लक्ष देण्याविषयी सूचना करताना नागरिकांना व नवी मुंबईत येणा-या पर्यटकांना पाहण्यास आनंददायी वाटेल अशा स्वरूपात चौक, मोकळ्या जागा, कचराकुंडी हटविलेल्या जागा यांचे नवनव्या संकल्पना राबवून सुशोभिकरण करावे असे आयुक्तांनी निर्देश दिले. शहराचे वेगळेपण अधोरेखीत करणा-या अभिनव संकल्पना शहर सुशोभिकरणात राबवाव्यात असे त्यांनी प्रकर्षाने सांगितले.

स्वच्छ सर्वेक्षणातील टूल किटच्या अनुषंगाने प्रत्येक बाबीवर करावयाच्या अपेक्षित कार्यवाहीचा आयुक्तांनी मुद्देनिहाय आढावा घेतला. यामध्ये सार्वजनिक व सामुदायिक शौचालयांची स्वच्छता, तलाव व नाले यांची स्वच्छता, कचरा वर्गीकरण व संकलन, कचरा वाहतुक आणि त्यावरील प्रक्रिया, डेब्रिजचे निर्मुलन, सांडपाण्याचे व्यवस्थापन या अनुषंगाने कोणत्या गोष्टींकडे, कसे लक्ष द्यावे आणि कोणते बदल करावेत याबाबत अपेक्षित कामांची तपशीलवार माहिती देण्यात आली. स्वच्छतेच्या अनुषंगाने नियमितपणे प्रत्यक्ष पाहणी करणे व आवश्यक सुधारणा करणे हे कार्यसूत्र अंगिकारून काम करावे असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

शहरातील बराचसा भाग सिडको, एमआयडीसी, रेल्वे यांच्या अखत्यारित असून स्वच्छतेमध्ये त्यांचाही सक्रीय सहभाग अतिशय महत्वाचा आहे. त्या अनुषंगाने त्यांच्या क्षेत्रातील स्वच्छतेकडे काटेकोर लक्ष देणे ही शहराच्या मानांकनासाठी त्यांचीही जबाबदारी आहे. याकरिता या प्राधिकरणांच्या संबंधित अधिका-यांची स्वच्छताविषयक बैठक आयोजित करून त्यांचीही मनोभूमिका तयार करण्याचे आयुक्तांनी सूचित केले.

शहरात अनेक जागांवर बेवारस वाहने धूळ खात पडलेली असून त्यामुळे शहर स्वच्छतेमध्ये अडथळा निर्माण होत आहे. या वाहनांबाबत पोलीस विभागाच्या सहयोगाने धडक मोहीम हाती घेण्याचेही निर्देश यावेळी देण्यात आले.

यावर्षीच्या सर्वेक्षणात नागरिकांच्या प्रतिसादाला अधिक महत्व आहे. शहरातील स्वच्छता उपक्रमांमध्ये स्वच्छताप्रेमी नवी मुंबईकर नागरिकांचा नेहमीच उत्स्फुर्त सहभाग असतो. त्यादृष्टीने स्थानिक पातळीवर निरनिराळे उपक्रम राबवून त्यामध्ये अधिकाधिक नागरिक सहभागी व्हावेत याकरिता प्रयत्न करावेत अशा सूचना देण्यात आल्या.

स्वच्छता काल होती म्हणजे उद्या असेलच असे नाही. स्वच्छता ही कायम करत राहण्याची गोष्ट आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपल्याला नेमून दिलेले स्वच्छता विषयक काम प्रामाणिकपणे करावे असे सूचित करीत स्वत: ठिकठिकाणी फिरून स्वच्छतेची पाहणी करणार असल्याचे व या कामात कोणतीही हयगय खपवून घेतली जाणार नाही असे आयुक्तांनी स्पष्ट केले.

स्वच्छतेमधील मानांकन उंचाविण्यासाठी गतिमान कार्यवाही करण्याकरिता महानगरपालिका सक्रिय झाली असून नागरिकांच्या संपूर्ण सहभागातून देशातील सर्वात स्वच्छ शहराचा बहुमान संपादन करण्यासाठी नवी मुंबई सज्ज आहे.

About Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.