भिंत खचली , कलथून खांब गेला ….!

0
29

अकोला : क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज “६ डिसेंबर 2020 स्पेशल _

६डिसेंबर१९५६ मानवतेच्या इतिहासातील अत्यंत काळा कुट्ट दिवस.या दिवशी हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेच्या शापातून लाखो लोकांना मुक्त करणारे,दलितांमध्ये आत्मविश्वासाचे प्रज्ञेचे स्फुल्लिंग जागविणारे, सर्वांचे बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले.हजारो वर्षांपासून पिढ्यान् पिढ्या अंधारात जगणार्‍या लोकांना साक्षात सूर्य भेटावा,पण तो भेटतो न भेटतो तोच मृत्यूरुपी काळ्या ढगांनी या सूर्याला गिळंकृत करावं,केवढं मोठं संकट!मला शिकायचंय!मला माणूस म्हणून जगायचंय!मी स्त्री आहे याचा मला अभिमान आहे.देशाच्या प्रगतीत माझा हातभार अत्यंत महत्त्वाचा आहे,याची जाणीव माझ्यात निर्माण झाली आहे.आपण आम्हाला ताठ मानेने जगायला शिकवलं आणि जीवनाचा डाव अर्ध्यावर सोडून निघून गेलात,या टाहोंनी ६डिसेंबर१९५६या दिवशी आसमंत निनादून टाकला.कुणाला वाटले आपले बाबा गेले.कुणा म्हातार्‍यांना बाबांसाहेबांमध्ये आपला लेक भासला,त्यांना आपला लेक सोडून गेल्याचे दुःख झाले.ज्या मतिमंदांना बाबासाहेबांमुळे आपल्या बुद्धीचा वापर करणे समजले ते मतिमूढ झाले.करोडो लोकांच्या डोळ्यांसमोर अंधाराचे साम्राज्य पसरले.लाखो स्त्रियांचा आधारस्तंभ एकाएकी कलथून गेला.६डिसेंबर१९५६ या दिवशी झालेल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणाने दलितांवर,तसेच स्त्रियांवर वज्राघात झाला.डॉ.बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार,राजनीतीज्ञ,समाजशास्त्रज्ञ, कायदेपंडीत,मानववंश शास्त्रज्ञ,अर्थतज्ज्ञ, इतिहासकार,शिक्षणतज्ज्ञ,पत्रकार,धर्मशास्त्रज्ञ, समाज क्रांतिकारक आणखी काय अन् किती सांगावं!या सर्वांसोबत सर्वात महत्त्वाचं बा भिमा!तू समस्त स्त्री वर्गाची माऊली आहेस. इतकं उत्तुंग कर्तृत्व असणाऱ्या व्यक्तिमत्त्वानं इतक्या छोटया छोटया गोष्टींकडे लक्ष द्यावं लेकीच्या!इतके सन्मानाचे जीने बहाल करावे! सारं विस्मयकारकच!जशी एखादी पुरोगामी आई लेकीला विचारांचे धन देते ना,छान समजाऊन पण सांगते,अगदी तसं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब लग्न झालेल्या आपल्या लेकींना सांगतात,”लग्नानंतर पत्नी पुरुषाची समान अधिकारी असलेली गृहिणी असली पाहिजे,ती नवऱ्याची गुलाम असता कामा नये.” लग्न झालेल्या प्रत्येक मुलीने पतीची मैत्रीण म्हणून त्याच्या प्रत्येक कार्यात सहकार्य द्यावे.मात्र गुलामाप्रमाणे वागविल्यास तिने खंबीरपणे नकार द्यावा व समतेसाठी आग्रह धरावा. कोणत्याही कारणासाठी का होईना ज्यावेळी एखाद्या स्त्रीची मूल होऊ देण्याची इच्छा नसेल,त्यावेळी तिला ती गर्भधारणाच टाळता येण्याची शक्यता असली पाहिजे आणि संतती जन्माला घालणे,हे सर्वस्वी तिच्या इच्छेवर अवलंबून असले पाहिजे तसेच मुले केव्हा आणि किती होऊ द्यावयाची हा निर्णय तिचाच असला पाहिजे.राष्ट्र संकल्पनेचे आधुनिक प्रारूप घडवायचे तर स्त्रियांनाही समान अधिकार,आर्थिक सक्षमता आणि वेळ आल्यास कुटुंब नावाची रचना जाचक ठरू लागल्यास विभक्त होण्याचे अधिकार असणे गरजेचे आहे,असे बाबासाहेब म्हणत.स्त्रियांच्या प्रगतीच्या आड त्यांची लग्ने येतात,हे बाबासाहेबांनी हेरले होते.म्हणूनच मुलींची लग्ने लवकर करून वैवाहिक जीवन त्यांच्यावर लादू नका.तसेच आपल्या आयुष्याचा जोडीदार निवडण्याचा मुलींना अधिकार असावा असेही ते म्हणत.
स्त्रीला माणूस म्हणून जगता यावं याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपले आयुष्य पणाला लावले.मनुस्मृति नावाचे अधर्मशास्त्र जाळून मनूने शिकविलेली वर्णाची आणि जातीची विषमता,त्याने शिकविलेला देव आणि दैववाद,त्याने शिकविलेली अंधश्रद्धा आणि परस्पर तुच्छता जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.गुलामांना गुलामगिरीची जाणीव झाली पाहिजे,म्हणजे मग ते आपोआप बंड करतील,या आंबेडकरांच्या विधानातील गृहीत हे सबंध मानवमुक्तीच्या सामाजिक परिवर्तनाचे मूलभूत तत्त्व होते.जोवर या देशातील प्रत्येक व्यक्ती ही खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा हक्क प्राप्त करू शकत नाही,तोवर या देशात एकात्मता निर्माण होऊ शकत नाही अशी त्यांची धारणा होती.म्हणूनच या देशातील स्त्रीला तिच्या गुलामगिरीची जाणीव करून देऊन,देशाच्या विकासात तिचेही योगदान किती महत्त्वाचे आहे,हे भारतीयांच्या लक्षात आणून देण्याचे काम डॉ.बाबासाहेबांनी केले.
स्त्रियांच्या बाबतीत तर मनुस्मृतीने अतिशय कठोर कायदे केले होते.त्यामुळे तिला जगणेही असह्य झाले होते परंतु स्त्रीच्या प्रगतीवर मानव जातीचे हित अवलंबून आहे,हे बाबासाहेबांना माहीत होते त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रीमुक्तीचे रणशिंग फुंकले.दि.२७ डिसेंबर १९२७च्या महाडच्या सत्याग्रहाच्या वेळेस जवळजवळ पाच हजार स्त्रियांची सभा बाबासाहेबांनी घेतली होती.स्त्री व पुरुष यांनी मिळून समाजाच्या,संसाराच्या अडचणी सोडविल्या पाहिजेत.पुरुषांनीच हे काम अंगावर घेतले तर ते पार पडण्यास त्यांना फार अवधी लागेल.तेच काम स्त्रियांनी जर अंगावर घेतले,तर त्यांना त्या कामात लवकर यश प्राप्त होईल असे ते म्हणत.दि.२० जुलै १९४२ साली नागपूरला दलित स्त्रियांची परिषद आयोजित करण्यात आली होती.या सभेत वीस पंचवीस हजार स्त्रिया उपस्थित पाहून बाबासाहेबांना आनंद झाला.ते म्हणाले “स्त्रियांची प्रगती ज्या प्रमाणात झाली असेल त्यावरून एखाद्या समाजाची प्रगती मी मोजत असतो.”
परंपरागत कायद्यांनी,अमानुष परंपरांनी जखडलेली स्त्री बाबासाहेबांनी संविधानात विकासाचे स्थान दिल्याबरोबर शिक्षण क्षेत्रातच नव्हे,तर आतापर्यंत केवळ पुरुषांची मक्तेदारी असलेले प्रत्येक क्षेत्र पादाक्रांत करू लागली.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांसाठी अभेद्य असे एक सुरक्षा कवच तयार केले.ते म्हणजे ‘हिंदू कोड बिल.’हिंदू कोड बिलाच्या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करताना कायदेमंत्री डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणतात,समाजातील वर्गावर्गातील असमानता,स्त्री-पुरुष यांच्यामधील असमानता तशीच अस्पर्शित राहू देऊन आर्थिक समस्यांशी निगडित कायदे संमत करीत जाणे म्हणजे आमच्या संविधानाची चेष्टा करीत जाणे होय आणि शेणाच्या ढिगाऱ्यावर राजप्रासाद बांधल्यासारखे होय.हिंदू कायद्याच्या संहितीकरणाविषयीच्या विधेयकाला बाबासाहेबांच्या लेखी अनन्यसाधारण महत्त्व होते कारण त्यायोगे स्त्रियांच्या बाबतीत केल्या जाणाऱ्या भेदभावाला आळा बसून त्या अधिक सक्षम बनतील असा त्यांना विश्वास होता.या कायद्याला बराच विरोध झाल्याने बाबासाहेबांना खूप मनस्ताप सहन करावा लागला.आज स्त्रीला घटस्फोटानंतर कायद्याने तिचे स्त्रीधन वापस मिळते,वारसाहक्काने संपत्तीचा हिस्साही मिळतो.तिच्या जीवनाला एक प्रकारचे स्थैर्य बाबासाहेबांनी प्राप्त करुन दिले.पण बहूजन स्त्री काय करते?देवाच्या कृपेने माझं सर्व चांगलं झालं म्हणून,वारसाहक्काने मिळालेल्या संपत्तीचा काही भाग देवाच्या पेटीत देणगी म्हणून टाकते. पण ज्या पित्याने आपल्या प्रकृतीची चिंता न करता,आपल्या सर्व लेकींसाठी अहोरात्र झटून कायदा केला,प्रसंगी मनस्तापही सहन केला. हिंदू कोड बिल संपूर्ण मान्य केले नाही म्हणून आपल्या कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, त्याचा बहुजन स्त्रीला विसर पडावा ह्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट ती कोणती!आज जेव्हा मी स्त्रियांना आत्मविश्वासाने उभे पाहते.अनेकींचे संसार चांगल्या रीतीने फुललेले पाहते,तेव्हा बाबासाहेबांच्या विचारांनी डोळ्यांत अश्रू गर्दी करतात आणि नकळत मी नतमस्तक होते.

डॉ. स्वप्ना लांडे
अकोला .

पाहिजेत _ महाराष्ट्र न्यूज चॅनल साठी संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात व प्रत्येक तालुक्यात , महानगरात पत्रकार तसेच विविध संपादक पदे भरण्यात येत आहेत इच्छुक असणारे व जनसंपर्क असणाऱ्यांनी संपर्क करावा.संपर्क : मा.भारत पवार, मुख्य संपादक ,मो.9158417131

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here