पाच जणांचे काळीज चिरडले ,नाशिक थरारले तर पंडित कॉलनीत आक्रोश

0
620

( अपघातात चक्काचूर झालेली स्विफ्ट कार छाया चित्रात दिसत आहे).                                                 *   आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिराती साठी संपर्क : मो.९१५८४१७१३१                                नाशिक : कसमादे टाइम्स महाराष्ट्र न्यूज प्रतिनिधी : मनमाड जवळील कुंदल गाव येथे घडलेला अपघात हा काळजाला चिरडून टाकून पाच जणांचा बळी गेल्याने नाशिक जिल्हाच ह्या घटनेने हळहळतो आहे तर बळी गेलेल्यांच्या आई , वडील, भाऊ ,बहीण जिवंतपणीच मरणयातना सोसत असल्यामुळे नाशिक नजीकच्या पंडित कॉलनीत आक्रोश होत असून संपूर्ण नाशिक  शोकसागरात बुडाल्याचे घटनेवरून दिसते.

अद्याप मिसरूडही फुटले नसताना या जगातून निघून जाणे, याच्या इतकी क्लेशदायक घटना कोणतीही नसावी. नाशिक शहरातील पाच तरण्याबांड मुलांचा नाहक गेलेला बळी सर्वांच्याच हृदयात कालवाकालव करून गेला. नाशिकच्या कॉलेज रोडवरील दोघांचा, पंचवटीतील पेठ रोड येथील दोघे व चोपडा लॉन्स येथील एकाचा या अपघातात बळी गेला. दोघे सख्खे भाऊ, दोघे चुलतभाऊ व अन्य एकजण, अशा पाच जणांचा इंदूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावर मनमाडजवळ अपघात झाला. विशेष म्हणजे, अतिशय लाडात वाढलेल्या या सर्वांचा बळी गेल्यानंतर त्यांच्या आई-वडिलांची अवस्था पाहिल्यानंतर अवघे नाशिक थरारले. गणेश सोनवणे, ललित सोनवणे, श्रेयस धनवटे, रोहित धनवटे, प्रतीक नाईक या पाच मित्रांचा अपघातात एका क्षणात मृत्यू झाला. पण तो मृत्यू काळजाला घरे करून गेला. आपली आई शोभा धनवटे यांच्याकडे हट्ट करून स्विफ्ट कार घेतलेल्या श्रेयस धनवटेच्या मृत्यूची वार्ता रात्री उशिरापर्यंत आईपासून लपवून ठेवण्यात आली होती; परंतु अखेर नाइलाज झाल्यानंतर संपूर्ण कुटुंबाला ही घटना कळविण्यात आल्यानंतर पंडित कॉलनीतील त्यांच्या निवासस्थानी आक्रोश सुरू झाला. मनमाडजवळील कुंदलगाव येथे म्हसोबा देवस्थान येथे ‘कारण’ होते, असे ‘कारण’ सांगून या सर्वांचा विना’कारण’ मृत्यू झाला. विशेष म्हणजे, कुणालाही वाचविता आले नाही. अपघात इतका भीषण हाेता की, कारचे पत्रे कापून पाचही मृतदेह बाहेर काढावे लागले. त्यातच पाऊस व गारपीट सुरू झालेली असल्याने मदतीत व्यत्यय येत होता. नागरिक व पोलिसांनी एकत्रित प्रयत्न करून हे मृतदेह बाहेर काढून तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. आपल्या लाडक्यांना अशा कार्यक्रमाला दूरवर का पाठवले जाते? हा सवाल समाजमाध्यमांत विचारला जात आहे. पण लाडावलेली बाळे आई-वडिलांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नसतातच. तो लाडावलेपणा त्या कुटुंबीयांना किती महाग पडतो, याचे ज्वलंत उदाहरण नाशिकमध्ये आज अनेकांच्या निदर्शनास पडले. सर्वच कुटुंबीयांची माहिती घेतली असता यातील श्रेयस धनवटे याचे कथानक अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणल्याशिवाय राहत नाही. श्रेयस हा संजय धनवटे या सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकांचा मुलगा. त्यांना दोन मुले आहेत, पण वडील भावाचे निधन झाल्यानंतर आपल्या वहिनीला दुःखातून सावरण्यासाठी अधिकृतपणे एक मुलगा दत्तक दिला. त्यामुळे शोभा धनवटे यांच्या जीवनाला श्रेयसमुळे एक आधार मिळाला होता. हा मुलगा हेच त्यांचे जीवन होते. त्यामुळे श्रेयस अतिशय लाडाकोडात वाढला. त्याचा प्रत्येक हट्ट पुरवणे कुटुंबीयांना गरजेचेच वाटत होते. आजी-आजोबांचेदेखील त्याच्यावर प्रचंड प्रेम केले होते. त्या दोघांचे निधन झाल्यानंतर संपूर्ण जबाबदारी आईवरच होती. त्यामुळे जी गोष्ट त्याला हवी असेल, ती पूर्वी आजी-आजोबांकडून मिळत होती व कालांतराने आईकडून मिळायला लागली. परवादेखील एवढे दूर ‘कारणा’साठी जायचे की नाही, याबाबत नकारघंटा असतानाही मित्रांना बरोबर घेऊन श्रेयस गेलाच. श्रेयसचा मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ‘दोन’ मातांच्या डोळ्यांतील अश्रू थांबायचे नाव घेत नव्हते. एकीने जन्म दिला, तर दुसरीने दत्तक घेऊन मोठे केले. आज दोघींचीही कूस उजाडली गेली. श्रेयसची आई शोभा धनवटे यांचे माहेर मौजे सुकेणे येथील माजी आमदार स्व. मालोजीराव मोगल यांच्या कुटुंबीयातीलच. पाच मृतदेहांवर नाशिकच्या स्मशानभूमीत प्रचंड गर्दीत अंत्यसंस्कार झाल्यानंतर माजी आमदार वसंतभाऊ गिते, शिवसेनेचे नेते अजय बोरस्ते यांनी श्रद्धांजली वाहत असताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू येत होते. या दुर्घटनेतील प्रतीक नाईक याचे आई-वडील अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्याला वाढवत होते. बारावीचे शिक्षण सुरू असताना त्याचाही मृत्यू झाला. त्यामुळे नाईक कुटुंबाचा आधारच गेला. या सर्वांचे लाडाकोडातील जीवन असल्यामुळे फार उच्च शिक्षण व नोकरी कुणाकडेही नव्हती. दोघे सोनवणे बंधू एकाच बिल्डर्सकडे काम करत होते, तर रोहित धनवटे वातानुकूलित यंत्रे दुरुस्तीत निपुण होता. जीवन फुलण्याआधीच संपले, याचे दुःख पालकांबरोबरच समाजालाही झाले आहे. कारण कोणतेही पालक हे आपल्या मुलाला एक चांगले जीवन देण्याचा प्रयत्न करतात. त्यासाठी जेवढ्या शक्य तेवढ्या गोष्टी ते करतात. कधीकधी ऐपत नसतानाही केवळ त्यांच्या सुखासाठी त्याला सुंदर जीवन जगण्याची संधी देतात, पण असे करत असताना पालकांकडूनही अति लाड केले जातात. या चुका मुलाच्या भविष्यासाठी अतिशय वाईट असतात. या पाचही तरुणांच्या लाडाचे परिणाम समाज पाहतोच आहे. अनेकदा मुले कोणत्या तरी गोष्टीबाबत नाराज होऊन बसतात. अशा वेळी त्या मुलाला खूश करण्यासाठी आई-वडील तो सांगेल तसा हट्ट पुरवतात. अशा स्थितीमध्ये मुलाला वाटते की, आयुष्यात भावनिक असण्याला काही अर्थ नाही. माणसाने भावनांना महत्त्व देऊ नये. हट्ट केला की सारेकाही मिळते, असा विचार त्यांच्या मनात रुजतो. त्यामुळे मुले अगदीच भावनाशून्य होऊन बसतात. त्यांना आत्मनिर्भर बनायला शिकवले पाहिजे. त्याऐवजी ते हट्टी बनतात व स्वतःचे जीवन धोक्यात आणतात. भविष्यात अशा घटना घडू नयेत म्हणून पालकांनी मुलांच्या बाबतीत काही कठोर नियम केले पाहिजेत. समाजातील अशा घटनांची उदाहरणे त्यांच्यासमोर ‘नकोशी’ असतानाही दिली पाहिजेत, तरच भविष्यातील ‘श्रेयस’सह त्याच्या मित्रांसारख्या घटना घडणार नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here