June 27, 2022

इतरांनी घ्यावा आदर्श : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत आदिवासी वस्तीत भरली संविधान शाळा

1 min read

भारत पवार : मुख्य संपादक : ९१५८४१७१३१.                                         क स मा दे टाइम्स महाराष्ट्र न्यूज _ प्रतिनिधी _

सटाणा : आदिवासी समाजामध्ये संविधान, संविधानातील तरतुदी, संवैधानिक हक्कांची जाणीव व्हावी, समाजात मुलभूत हक्क, मानवाधिकार, ‘पेसा कायदा’ तसेच इतर कायदेविषयक बाबींविषयी जागृती व्हावी या हेतूने आदिवासी मित्र प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांच्या नेतृत्वाखाली ‘संविधान शाळा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात बागलाण तालुक्यातील अजमेर सौंदाणे या गावातून करण्यात आली.

२६ जानेवारी १९५० रोजीपासून स्वतंत्र भारतात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या अथक प्रयत्नातून निर्माण झालेल्या संविधानाची प्रत्यक्षात अंमलबजावणी सुरु करण्यात आली. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना आणि राष्ट्रीय चळवळीतील राष्ट्रपुरुषांना अपेक्षित असणाऱ्या न्यायपुर्ण, समताधिष्टीत, निर्भय समाजाच्या रचनेसाठी संविधानामध्ये सविस्तर तरतुदी असुनही त्यांची पुरेपुर अंमलबजावणी आजही होताना दिसत नाही. परिणामी समाजातील दारिद्र्य, विषमता, संधीवंचितता, विशिष्ट घटकांप्रती दुय्यमत्व, अन्याय-अत्याचार या घटनाविसंगत बाबी आजही दिसून येतात. यावर मात मिळवायची असेल तर समाजात संविधानाविषयीची साक्षरता वाढली पाहिजे, संविधानातील तरतुदी समाजामध्ये झिरपल्या पाहिजेत यासाठी भारताच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनाच्या औचित्यावर आदिवासी मित्र प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांच्या संकल्पनेतून ‘संविधान शाळा’ या अभिनव उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

याविषयी माहिती देताना प्रा. बच्छाव म्हणाले की, समाजाला ‘संविधान’ म्हणजे काय ? हे कळावे, त्यामध्ये असणाऱ्या मुलभूत अधिकार, मानवाच्या प्रतिष्ठेसाठीचे घटनात्मक प्रयत्न, मानवाधिकार, व्यक्तिच्या प्रतिष्ठापुर्ण जगण्यासाठीचे प्रयत्न, न्याय्य व समान संधी, संविधानाच्या तरतुदी प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीच्या यंत्रणा ह्या सर्व बाबी नागरीकांना कळाव्यात यासाठी ‘संविधान शाळा’ हा उपक्रम सुरु करत आहे.
या उपक्रमाच्या माध्यमातून गावा-गावात, वाड्या-वस्त्यांमध्ये जावून वंचित घटकांमध्ये संविधान आणि इतर कायद्यांविषयी लोकांना साक्षर केले जाणार आहे.
२६ जानेवारी हा दिवस प्रजासत्तात दिवस असतो या दिवशी संविधानाचे महत्व लोकांना सांगीतले पाहिजे असे प्रयत्न शासकीय आणि सामाजिक पातळीवर होताना दिसत नाहीत. प्रसारमाध्यमेही संविधानाची माहिती न देता सीमा-सीमांतर्गत तणाव, धर्मद्वेष, राष्ट्रा-राष्ट्रातील विद्वेषकारी चित्रपच वा मालिकांचे प्रसारण करतात जे, की प्रजासत्ताक दिनाच्या औचित्याच्या विसंगत आहे. त्यामुळे लोकांमध्ये संविधानाची माहिती आणि जागरुकता होणे आवश्यक आहे यासाठी ‘संविधान शाळा’ हा उपक्रम हाती घेत आहे असेही आदिवासीमित्र प्रा. अमोल बाळासाहेब बच्छाव यांनी सांगीतले.

‘संविधान शाळेचा’ पहिला वर्ग प्रजासत्ताक दिनी सायंकाळी बागलाण तालुक्याच्या अजमेर सौंदाणे गावात भरला, यावेळी संविधानात्मक तरतुदी आणि कायदेशीर उपाययोजना याविषयावर प्रा. अमोल बच्छाव यांनी मार्गदर्शन केले, घटनानिर्मीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे योगदान या विषयावर जितेंद्र बच्छाव यांनी प्रकाश टाकला, ‘प्रजासत्ताक दिनाचे महत्व या विषयावर वंचित बहुजन आघाडीचे तालुका महासचिव दादा खरे बोलले, तर उपक्रमाचा हेतू वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष शेखर बच्छाव यांनी स्पष्ट केला. निलेश देवरे यांनी प्रस्तावना, तर सचिन सोनवणे यांनी आभार व्यक्त केले.
याप्रसंगी परिसरातील आदिवासी बांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.