June 27, 2022

नाशिक बेसावध नवी मुंबई महानगरपालिका झाली सावध आयुक्तांनी घेतली तातडीने बैठक

1 min read

नवी मुंबई  – क स मा दे टाइम्स ” महाराष्ट्र न्यूज _ “प्रतिनिधी_
नाशिकमध्ये झाकीर हुसैन रूग्णालयात घडलेल्या ऑक्सिजन गळती दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी तातडीने बैठक आयोजित करीत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ऑक्सिजन सुविधा यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी अतिरिक्त आयुक्त श्री. संजय काकडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. धनवंती घाडगे, ऑक्सिजन पुरवठा नियंत्रण अधिकारी उपआयुक्त डॉ. बाबासाहेब राजळे तसेच ऑक्सिजन पुरवठा यंत्रणा पुरवठादार उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर, राधास्वामी आश्रम आणि एक्स्पोर्ट हाऊस याठिकाणी ऑक्सिजन बेड्सची सुविधा उपलब्ध आहे. येथे ड्युरा सिलींडरच्या माध्यमातून ऑक्सिजन पुरवठा केला जात असून तेथील संपूर्ण प्रक्रियेची माहिती घेत आयुक्तांनी या तिन्ही ठिकाणी सुरक्षा यंत्रणेमध्ये व सुरक्षा साधनांमध्ये त्वरित अधिक वाढ करण्याचे निर्देश दिले.

सद्यस्थितीत महानगरपालिकेकडे 100 ड्युरा सिलेंडर असून त्यामध्ये अधिक 50 ड्युरा सिलेंडरची वाढ करण्यात येत आहे.

याशिवाय नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सिडको एक्झिबिशन सेंटर येथे 75 आयसीयू बेड्स व 30 व्हेंटिलेटर्सची रूग्णालयीन सुविधा लवकरच कार्यान्वित होत असल्याने त्याठिकाणी आवश्यक असलेली पुढील ऑक्सिजनची गरज लक्षात घेऊन या वाढीव्यतिरिक्त ड्युरा सिलेंडरमध्ये आणखी वाढ करण्याचे आयुक्तांनी आदेशित केले.

साठवणूक केलेल्या सिलेंडरमध्ये असणारा लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन हा दिवसागणिक कमी होत असतो, त्यामुळे सिलेंडरची साठवणूक करताना वेळेचे योग्य नियोजन करावे व सिलेंडरच्या कालावधीकडे अधिक काटेकोर लक्ष देण्याचे आयुक्तांनी निर्देशित केले. तसेच हे सिलेंडर जरा अधिक काळ टिकण्यासाठी त्यावर अतिथंड पाणी पडत राहण्याची सोय करण्याच्या दृष्टीने सर्व ठिकाणी चिलींग सिस्टीम बसवावी असेही सूचित केले.

ऑक्सिजन बेड्स तसेच आयसीयू सुविधा असणा-या सर्व खाजगी कोव्हीड रूग्णालयांनी आपली बेड्सची क्षमता विचारात घेऊन आवश्यक ऑक्सिजन साठ्याच्या 3 पट अधिकचा साठा उपलब्ध करून ठेवणेबाबत तसेच त्या अनुषंगाने आवश्यक सुरक्षा बाळगणेबाबत त्यांस पत्राव्दारे सूचित करणेचे निर्देश आरोग्य विभागास देण्यात आले.

नाशिकमध्ये घडलेली आकस्मिक घटना अत्यंत दुर्देवी असून प्रत्येक यंत्रणेने अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे सांगत आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी या घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या सर्व नागरिकांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © All rights reserved. | kavyashilp Digital Media 7264982465 | Newsphere by AF themes.